Sunday, September 8, 2024
Homeनाशिकगटविकास अधिकाऱ्यांचा इशारा; ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार

गटविकास अधिकाऱ्यांचा इशारा; ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार

दिंडोरी | प्रतिनिधी

वेळेच्या आधी शाळेला सुट्टी देणे अथवा शाळेवर निर्धारीत वेळेच्या आधी शाळा सोडणे अथवा शाळेवर उशिरा पोहचणे तसेच शाळेतून वेळेच्या अगोदर निघुन जाणार्‍या शिक्षकांचा मी स्वत: शोध घेणार असून त्यासाठी तालुक्यातील शाळांवर अचानक भेटी देवून पाहणी करण्यात येईल व रजेवर असूनही रजा तक्ता भरलेली नसल्यास संबंधितांवर कायदेशिर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिला आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक तास अगोदर शाळेला सुट्टी दिली होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली होती. याबाबत सविस्तर वृत्त दैनिक देशदूतने वृत्त प्रसिध्द केले असता शिक्षणविभागाकडून याबाबत खुलासा मागविला आहे. त्याचबरोबर गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या स्वत: तालुक्यातील शाळांना भेटी देणार असल्याची माहिती दिली. या भेटी दरम्यान शिक्षकांची अनुपस्थितीचे कारण बघितले जाणार आहे.

त्याचबरोबर येण्या-जाण्याची वेळ ही शासनाने निर्धारीत केलेल्या वेळेनुसार आहेत की, नाही याची देखील तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील शिक्षण पध्दतीला आलेली मरगळ झटकली जाणार आहे.विशेषत: व्दिशिक्षिकी शाळांमध्ये एकमेंकांना सावरुन घेण्यासाठी रजेचा फार्म्युला वापरण्यात येतो. रजेच्या दिवशी रजा तक्ता भरणे आवश्यक राहिल.

अत्यावश्यक रजा घेतल्यास व त्याबाबत मुख्याध्यापकांपर्यंत रजेचा अर्ज पोहचविला असल्यास मुख्याध्यापकांनी त्या अर्जावरुन संबंधित शिक्षकांची रजा तक्त्यामध्ये भरणे अनिवार्य असेल. रजेवर असलेल्या शिक्षकाची रजा तक्तामध्ये नोंद आढळून न आल्यास संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिला आहे.

याचबरोबर शालेय अध्यापनाच्या वेळी मोबाईल वापरावर देखील निर्बंध घालण्यात यावे, अशा मागणीने देखील जोर धरला आहे. त्यावर देखील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दखल घ्यावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

मोबाईल वापरावर बंदी आणावी

मविप्र संस्थेतील शिक्षकांनी अध्यापन करतांना अथवा वर्गांमध्ये मोबाईलचा वापर न करण्याबाबत सूचना नवनिर्वाचित संचालक प्रवीणनाना जाधव यांनी दिले आहे. त्यानुसार मविप्रच्या सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी याची जबाबदारी घेत मोबाईल वापरावर बंदी आणली आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेने देखील या उपक्रमाचा आदर्श घेणे अपेक्षित आहे.

शालेय कामकाजाच्या वेळी मोबाईल वापरावर बंदी मुख्याध्यापकांकडून आणणे आवश्यक आहे. कारण शाळेतील शिक्षकांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक साहित्यापुरताच करावा. शासनाच्या आदेशाप्रमाणे शालेय वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी आहेत. तरीही अनेक ठिकाणी वर्गात अध्यापन सुरु असतांनाही मोबाईलचा सर्रासपणे वापर होत असतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या