राहुरी|प्रतिनिधी|Rahuri
तू आमच्या घरासमोरील रस्त्याने का जातोस? तू आमच्या घरासमोरील रस्त्याने जायचे नाही, असे म्हणून चार जणांनी पाटीलबा बाचकर यांना कुर्हाड, लाकडी दांडे व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना दि. 8 जुलै रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत राहुरी बाजार समितीच्या संचालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील पाटीलबा रंगनाथ बाचकर यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते पत्नी मीराबाई पाटीलबा बाचकर, मुलगा कुंदन पाटीलबा बाचकर असे कुटुंबासह एकत्रित राहतात. पाटीलबा बाचकर हे सध्या पाटबंधारे विभाग राहुरी येथे नोकरीस आहेत. तसेच त्यांच्या घराचे शेजारी अण्णासाहेब रंगनाथ बाचकर हे त्यांच्या कुटुंबासह एकत्रीत राहतात. पाटीलबा बाचकर आणि अण्णासाहेब बाचकर या दोघांमध्ये रस्त्याच्या जाण्यायेण्यावरून वाद आहेत.
दि. 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाटीलबा बाचकर हे अण्णासाहेब बाचकर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून कामावर जात असताना अण्णासाहेब रंगनाथ बाचकर हे हातात कुर्हाड घेऊन, अमोल अण्णासाहेब बाचकर हे हातात लाकडी दांडा घेऊन तसेच तेजस अण्णासाहेब बाचकर व अनिता अण्णासाहेब बाचकर हे तिथे आले व पाटीलबा बाचकर यांना शिवीगाळ करून अण्णासाहेब बाचकर म्हणाले, तू आमच्या घरासमोरील रस्त्याने का जातोस? तू घरासमोरील रस्त्याने जायचे नाही.
तेव्हा पाटीलबा बाचकर म्हणाले, हा रस्ता सार्वजनिक आहे. त्यामुळे मी या रस्त्याने जातो. तेव्हा अण्णासाहेब बाचकर यांनी त्यांच्या हातातील कुर्हाडीचा दांडा पाटीलबा बाचकर यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच अमोल बाचकर याने डोक्यात लाकडी दांडा मारला. तेजस बाचकर व अनिता बाचकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पाटीलबा बाचकर यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा कुंदन पाटीलबा बाचकर, पत्नी मीराबाई पाटीलबा बाचकर सोडवण्यासाठी आले असता अण्णासाहेब बाचकर यांनी त्यांच्या हातातील कुर्हाडीचा तुंबा मुलगा कुंदन याच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच अमोल बाचकर याने त्याची हातातील लाकडी दांडा मुलगा कुंदन याचे डोक्यात, पाठीत मारून त्यास जखमी केले.
वरील सर्वांनी पाटीलबा बाचकर व त्यांची पत्नी मीराबाई, मुलगा कुंदन यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर या रस्त्याने परत गेलात तर तुमचा मुडदा पाडू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अण्णासाहेब रंगनाथ बाचकर, अमोल अण्णासाहेब बाचकर, तेजस अण्णासाहेब बाचकर, अनिता अण्णासाहेब बाचकर सर्व राहणार गोटुंबे आखाडा, तालुका राहुरी, या चार जणांविरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अमित राठोड हे करीत आहेत.