Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमAhilyanagar : ‘ग्रो मोअर’ प्रकरणाचा ‘मनी ट्रेल’ तपास सुरू

Ahilyanagar : ‘ग्रो मोअर’ प्रकरणाचा ‘मनी ट्रेल’ तपास सुरू

शिर्डीच्या संशयित आरोपींच्या बँक खात्यावरील व्यवहारांची होणार तपासणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चांगला परतावा मिळेल अशा आमिषाने नागरिकांची फसवणूक करणार्‍या ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या राहाता आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘मनी ट्रेल’ (आर्थिक मार्गाचा मागोवा) तपासले जात आहे. शासनाच्या पॅनलवरील कंपनीची यासाठी नियुक्ती केली असून, त्यांच्याकडील अहवाल प्राप्त झाल्यानंतर या आर्थिक घोटाळ्यातील पैसे संशयित आरोपींच्या खात्यावर कसे आले आणि कुठे गेले याची माहिती मिळणार आहे. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

चांगला परतावा मिळेल अशा आमिषाने भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. शिर्डी) याने राहाता, शिर्डी परिसरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी राहाता व शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सावळे याला राहाता पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीच्या कालावधीत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यासह इतर संशयितांच्या नावे असलेल्या 11 बँक खात्यांमध्ये तब्बल 865 कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

YouTube video player

तसेच त्याने स्थापन केलेल्या ‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’, ‘ग्रो मोअर फिनकेअर सर्व्हिसेस’, ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘ग्रो मोअर स्वराज्य कॅपिटल’ या कंपन्यांमार्फत शेकडो गुंतवणूकदारांकडून तब्बल 553 कोटी रूपयांची गुंतवणूक उभारली होती. यातील 454 कोटी रूपये गुंतवणूकदारांना परत दिल्याचा दावा त्याने चौकशीत केला आहे, तर उर्वरित रक्कम शेअर मार्केटमधील व्यवहारांमध्ये गुंतवली असून त्यामध्ये नुकसान झाल्याचेही त्याने कबूल केले होते.
दरम्यान, तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली होती. ग्रो मोअर कंपनीच्या बाहेरील 13 व्यक्ती/कंपनी/फर्म यांच्या नावे एकूण 9 कोटी 64 लाख 28 हजार 694 रूपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत.

सावळे याने पोलीस तपासात दिलेली माहिती व त्याच्या विविध बँक स्टेटमेंटनुसार हा व्यवहार कसा झाला. त्याने सांगितलेल्या रकमा बँक खात्यात कशा आल्या. त्याने शेअर मार्केटमध्ये कशा पध्दतीने गुंतवणूक केली. कंपनीच्या बाहेरील 13 जणांच्या खात्यावर रकमा नेमक्या कोणत्या हेतूने आणि कोणाच्या खात्यात वळवण्यात आल्या, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखेला घ्यायचा असून त्यासाठी त्यांनी मनी ट्रेल करण्याचा निर्णय घेतला आहे. मनी ट्रेल अहवाल आल्यानंतर तपासाला आणखी गती येणार आहे.

शेअर मार्केटमध्ये 200 कोटींचा झोल

चांगला परतावा मिळेल अशा आमिषाने सावळे व त्याच्या साथीदारांनी नागरिकांकडून पैसे घेतले. ते पैसे त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. पोलिसांनी शेअर मार्केटच्या विविध कंपन्यातील ‘डीमॅट’ खात्याचे स्टेटमेंट (खाते उतारा) काढले असता त्यात सुमारे 200 कोटी रूपयांची उलाढाल झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेअर मार्केटमधील व्यवहारांमध्ये नुकसान झाले असल्याचे सावळे सांगत असला तरी यासंदर्भातील मनी ट्रेल अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी खुलासे समोर येणार आहेत. दरम्यान, सावळे याला शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. त्यावेळी पोलिसांकडून आणखी चौकशी केली जाईल. गुन्ह्यातील इतर पसार संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...