Wednesday, September 30, 2026
Homeनगरग्रो मोअर फसवणूक प्रकरण : शिर्डीच्या संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

ग्रो मोअर फसवणूक प्रकरण : शिर्डीच्या संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ग्रो मोअर कंपनीच्या फसवणूकप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोघा संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. के. पठाण यांनी नामंजूर केले आहेत. राजाराम भटू सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी), सुबोध सुकदेव सावळे (रा. साईप्रसादनगर, शिर्डी) अशी जामीन अर्ज नामंजूर केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, राहाता येथील सत्र न्यायालयाने देखील या दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले होते.

- Advertisement -

भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली; मात्र ठरलेला परतावा आणि मूळ गुंतवणूक न देता सर्वांची फसवणूक करण्यात आली. सुरूवातीला राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात देखील यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे आणि संदीप सावळे यांना अटक करण्यात आली आहे.

यातील भूपेंद्र सावळे याच्याविरूध्द राहाता व शिर्डी या दोन्ही गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या गुन्ह्यातील राजाराम सावळे, सुबोध सावळे, अरूण नंदन यांच्यासह इतर संशयित अद्यापही पसार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. राजाराम सावळे, सुबोध सावळे, अरूण नंदन यांनी राहाता येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. तेथे त्यांचे जामीन अर्ज नामंजूर करण्यात आल्यानंतर राजाराम सावळे, सुबोध सावळे यांनी खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केले. न्यायमूर्ती पठाण यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. तपासी अधिकारी सहायक निरीक्षक आठरे यांनी म्हणणे सादर केले. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ए. ए. खान यांनी अटकपूर्व जामिनास विरोध केला. न्यायालयाने दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.

ताज्या बातम्या

Sachin Vaze : मोठी बातमी! माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला धक्का;...

0
मुंबई | Mumbai उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयच्या कोठडीत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना मुंबईतील...