अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘ग्रो मोअर’ कंपनीच्या फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तिघा संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज राहाता येथील सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी नामंजूर केले आहे. राजाराम भटू सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी), सुबोध सुकदेव सावळे (रा. साईप्रसादनगर, शिर्डी) व अरूण रामदास नंदन (रा. नाशिक) अशी जामीन अर्ज नामंजूर केलेल्या संशयितांची नावे आहेत.
भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली; मात्र ठरलेला परतावा आणि मूळ गुंतवणूक न देता सर्वांची फसवणूक करण्यात आली. सुरूवातीला राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात देखील यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे आणि संदीप सावळे यांना अटक करण्यात आली आहे. यातील भूपेंद्र सावळे याच्याविरूध्द राहाता व शिर्डी या दोन्ही गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या गुन्ह्यातील राजाराम सावळे, सुबोध सावळे, अरूण नंदन यांच्यासह इतर संशयित अद्यापही पसार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. तिघा संशयितांनी राहाता येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. त्यावर सुनावणी घेण्यात आली. तपासी अधिकारी सहायक निरीक्षक आठरे यांनी म्हणणे सादर केले. सरकारी पक्षाच्या वतीने तिघांच्या अटकपूर्व जामिनास विरोध करण्यात आला. न्यायालयाने तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.




