शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्य काही भागातील गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणुकीची व्याप्ती खूप मोठी असून याचा सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे. मात्र गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ना. विखे पाटील यांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात सर्व वरिष्ठ पोलीस तसेच महसूल अधिकारी यांची बैठक घेऊन आजपर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्यासह या संपूर्ण घटनेचा तपास करणारे अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, गुंतवणूक करणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. केवळ चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने शिर्डी आणि परीसरासह अन्य काही भागातून 300 ते 400 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असावी असा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फसवणूक करणार्या सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. यामध्ये शिर्डी संस्थानमधील कर्मचार्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. परंतु काही कर्मचारी कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचे उघड झाल्याने या कर्मचार्यांनी कुठे भाविकांची फसवणूक केली आहे का याचाही तपास होण्याची आवश्यकता आहे.
सध्या सात लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्या सर्वांचे कॉल रेकॉर्डची तपासणी झाली पाहिजे. गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन कंपनीच्या प्रतिनिधींनी कुठे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केले असतील तर त्याची चौकशी करून असे व्यवहार तातडीने थांबविण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र गुंतवणूक झालेली रक्कम आणि गुंतवणूकदारांची संख्या पाहता अद्यापही पाहिजे तेवढे तक्रारदार पुढे यायला तयार नाहीत. त्यामुळे ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल.
तक्रार राहाता किंवा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या. जिल्ह्यातील शेवगाव, पारनेर, सुपा येथेही अशाच कंपन्या स्थापन करून नागरिकांची फसवणूक झाली याचाही तपास सुरू आहे. शेवगाव येथील घटनेतील आरोपीस न्यायालयाने जामीन नाकारला आहे. शिर्डीच्या घटनेत यापूर्वी कंपनीच्या लोकांकडून पोलीस यंत्रणेतील काही लोकांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती समोर आली आहे. याचीही चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.




