Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुलांमध्ये वाढता क्रोध धोकादायक

मुलांमध्ये वाढता क्रोध धोकादायक

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

आजच्या काळात बर्‍याच घरांमध्ये आई-वडील दोघेही कामावर जातात. त्यामुळे कळत-नकळत त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेत मोठ्या प्रमाणावर बदल होण्यात होत असल्याचे दिसून येत आहे. मुलांमधील क्रोधाचे प्रमाण वाढत असून लहान-सहान गोष्टींवरून त्यांच्यात संतप्त भावना दिसत आहेत. शहरातच नव्हे तर राज्यात घडणार्‍या गुन्हेगारी घटनांमध्ये 14 ते 25 वयोगटांतील मुलांचा सहभाग दिसून येत आहे.

- Advertisement -

मुलांची मानसिकता किंवा कल हा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने चुकीच्या बाबींकडे जास्त होताना दिसत आहे. लहानपणापासून घरात मुले त्रास द्यायला लागली की त्यांना शांत बसण्याकरता पालकांकडून मोबाईल दिला जातो. काही घरांत पूर्वी मुलांना मोबाईल दिला जात नव्हता. मात्र करोनाकाळात नाईलाजाने पालकांना मुलांच्या हाती मोबाईल सोपवणे भाग पडले. आता ते सवयीचे झाल्याने बर्‍याच ठिकाणी मुले हट्टी बनल्याचे दिसते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सध्या अनेक चित्रपटांमधून खलनायकाला नायकाचे स्थान दिले जात आहे. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांसह 25 वयोगटातील मुले गुन्हेगारीकडे आकर्षित होताना दिसत आहेत. गाडीचा कट लागला म्हणून सामंज्यस्याची भूमिका न घेता त्याचे रूपांतर हाणामारी होताना दिसून येते. मग समोरील व्यक्ती हा त्या लहान मुलांपेक्षा वयाने कितीही जेष्ठ असो. आडगाव नाक्यावर काही महिन्यांपूर्वी गाडीच्या चाकाते हवा न भरून दिल्यामुळे दुकानदाराचा खून झाला होता. त्या घटनेत तरुणाचा सहभाग होता. शहरात कित्येक ठिकाणी कोयत्याने दहशत माजवणारे किंवा काही ठिकाणी गाडीच्या काचा फोडणारे हे 25 वयोगटाच्या आतीलच होते. या घटनांमुळे तरुणाई कुठल्या दिशेला जात आहे हे लक्षात येते.

मुलांशी संवाद महत्वाचा

आजकाल पालकांचा मुलांशी संवाद कमी आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे बरेच पालकांना आपल्या मुलांकडे फार कमी काळ वेळ देता येतो. आपले मूल दिवसभर काय करते? याबाबत त्यांना फारशी माहिती नसते. पालकांनी आपल मुल काय करते? त्याचे मित्र कोण आहेत? त्याला काय आवडते? त्याच्यात असलेल्या कला गुणांना ओळखून भविष्यात त्याला काय करता येईल? याबाबत कायम मार्गदर्शन करणे यांकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे.

पोलिसांकडून प्रबोधन गरजेचे

शहरातील चौक चौकांत पोलिसांनी स्वयंसेवकांच्या किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लहान मुलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे. यात गुन्हेगारी केल्यावर काय शिक्षा होऊ शकते? व गुन्हेगारांचे भवितव्य काय असते? याबाबत जागरूकता करण्याची गरज आहे.

14 ते 25 वयोगटातील मुले वेगळ्या स्थित्यंतराच्या अवस्थेत असतात. त्यांना समजावून घेण्याचे प्रयत्न ना त्यांचे आई-वडील करतात ना शिक्षक! काही शिक्षकच मूल घडावे याकरता प्रत्यनशील असतात. आजचे चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमधून प्रबोधन घडावे, असे काहीच नाही. नको त्या गोष्टी मुलांना त्यात बघायला मिळतात. मुलांमध्ये मुळात क्रोध नसतोच. त्यांच्यात लोभाचा भाव निर्माण झाला की त्यांच्या आशा-अपेक्षा वाढणार. लाभ व्हायला लागला की लोभ वाढतो आणि नाही झाला तर क्रोध वाढतो. त्यामुळे कुठल्याही हिंसक वळणावर मुले येऊ शकतात याचा पालकांनी विचार करायला हवा.

– माधवदास महाराज राठी

आजच्या मुलांची मानसिकता बदलायला मोबाईल व टीव्ही मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. यामुळे मुले घराच्या बाहेरचे खेळ विसरत चालले आहेत. मैदानी खेळांचा त्यांना विसर पडत आहे. ही सवय बदलल्यास मुलांच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणावर अमूलाग्र बदल घडू शकतो.

– राजेंद्र मंदार, लाईफ कोच

- Advertisment -

ताज्या बातम्या