Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याअंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला वाढता विरोध

अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला वाढता विरोध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंजनेरी ते ब्रह्मगिरी या साडेपाच किलोमीटरच्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये तब्बल 450 गिधाडांचा अधिवास आहे. या दोन्ही डोंगरांना जोडण्यासाठी रोपवे उभारल्यास या गिधाडांचे काय होईल म्हणून या प्रस्तावाला स्थानिक रहिवाशांबरोबरच पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. पर्यावरण प्रेमींनी ब्रह्मगिरीच्या पायथ्यावर वृक्षसंपदेच्या ‘रोपांच्या रोपवे’ चे उद्घाटन करत विरोधाला धार आणली आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

वृक्षसंपदेच्या रोप वे चा आनंद आखाड्याचे स्वामी गणेशानंद सरस्वती महाराजांच्या हस्ते शुभारंभ करून सरकार व समाजाला ब्रह्मगिरी वृक्षरोपणाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आले.

तपोभूमीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी वृक्षसंगोपनाचे महत्व सरकारच्या लक्षात आणून देणे गरजेचे झालेले आहे असे सांगत ब्रह्मगिरीच्या पायर्‍यांवर वृक्षसंपदेच्या ‘रोपांचा रोप..वे’ तयार करून येथील वृक्षसंपदेसाठी सरकारने व समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आले.

आपल्या नावाने एक तरी रोप ब्रह्मगिरी पर्वतावर लावण्याची अनेक भाविकांची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प पर्यावरण प्रेमींनी केला आहे. वृक्षसंपत्तीने समृद्ध विविध भारतीय प्रजातींच्या रोपांची लागवड या निमित्ताने ब्रह्मगिरी तसेच अंजनेरी पर्वतावर करण्यात येणार आहे.

गिधाड या जटायू प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात घालून अंजनेरी ब्रह्मगिरी रोपवेची काय गरज असा प्रश्न घेवून पर्यावरण प्रेमींनी वनमंत्र्यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकार्‍यांकडे उपस्थित केला आहे. ब्रह्मगिरी अंजनेरी येथील पुरातन वनांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या ठरावाला मान देवून या दुर्मिळ होत चाललेल्या गिधाड पक्ष्यांचा अधिवास संवर्धन करण्याची अपेक्षा पर्यावरण व पक्षी प्रेमींनी व्यक्त केली आहे.

पर्यावरण प्रेमींनी ग्रामस्थांच्या रोपवे विरोधातील ठरावाचा मान ठेवून रोपवेचा नाद सोडून ब्रह्मगिरी संवर्धनाचा ध्यास घेण्याचा इशारा शासन प्रशासनास दिला. याप्रसंगी मेटघर ग्रामस्थ, हरित ब्रह्मगिरीचे ललित लोहगावकर, कैलास देशमुख, प्रकाश दिवे, जयंत दाणी, जीवन आदी सदस्यांसह पर्यावरण प्रेमी विविध संस्थांचे निशिकांत पगारे, जगबीर सिंग, डॉ.संदीप भानोसे, भारतीताई जाधव, योगेश बर्वे, कुलदीप कौर,मनीष बाविस्कर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या