अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील महाविकास आघाडीचे हे तीन पक्षाचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही. जर एखादा आमदार इकडचा तिकडे झाला, तर तो पुन्हा निवडून येणार नाही, असा टोला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला.
दरम्यान, ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून तुर्तास नियुक्ती देण्यात येऊ नयेत, असे आदेश आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत न्यायालयातील सुनावणी झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
जिल्ह्याच्या करोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, भाजपने रामदास आठवले यांना खासदार केले आहे. त्यामुळे त्यांना काही ना काही बोलावे लागते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे, त्यांचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.
याबाबत प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डाळिंबाच्या प्रश्नावर सुध्दा योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ पवार यांच्या संदर्भामध्ये मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, हा विषय आजोबा आणि नातू यांच्यातील आहे. आजोबा नातवाला बोलू शकतात. मुलांना बोलू शकतात व समजून सांगू शकतात.
नगर लॉकडॉऊन करावे, अशी सातत्याने मागणी खा. सुजय विखे यांनी केली होती. मात्र, आजच्या बैठकीला ज्यांनी मागणी केली तेच आले नाही. ते आले असते तर लॉकडाऊनवरही चर्चा झाली असती, असा टोला खा. विखे यांना लगावला.
प्रशासकीय पातळीवर करोनाच्या काळात काही जणांकडून चुका झाल्या असतील. त्यात आम्ही सुधारणा करत आहोत.गेल्या चार महिन्यांपासून अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला समजून घ्या, असे सांगत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलगिरी व्यक्त केली. नगर शहरामध्ये आता दोन नव्याने चाचणी केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.