अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील विविध विभागांतील अधिकार्यांमध्ये सुसंवाद आणि समन्वय कायम राहिल्यामुळेच राज्यातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अग्रस्थानी राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचे आवाहन जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नवीन तसेच बदलून आलेल्या अधिकार्यांच्या सन्मानासाठी आयोजित स्नेहसंवाद मेळावा पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास प्रक्रिया, शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती आणि भविष्यातील योजना यांचा आढावा घेतला. यावेळी आमदार विठ्ठल लंघे, आमदार विक्रम पाचपुते, साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आयुक्त यशवंत डांगे, शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हा आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षात शासनाच्या सामाजिक उपक्रमांमुळे सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेता आले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सुमारे 25 लाख लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले देण्यात आले. ‘लाडकी बहीण योजना’साठी 13 लाख महिलांनी नोंदणी केली असून, घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणीही झाली आहे. या सर्व यशस्वी उपक्रमांमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रक्रमावर आहे. मंत्री विखे पाटील यांनी यावेळी पुढील काळात जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, तसेच माध्यमिक शिक्षण व कौशल्य विकास यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. प्रत्येक विभागाने आपले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करून त्या अनुषंगाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात विकास प्रक्रिया चांगल्या पध्दतीने राबवली गेल्यामुळे महायुतीला जनतेचे पाठबळ मिळाले. अधिकारी व कर्मचार्यांशी चांगला संवाद ठेवल्यास काम गतीने होते. फक्त आवाज चढवून बोलून काम होत नाही, याचे भान ठेवले पाहिजे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. साखर आयुक्त सालीमठ यांनी मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वातील सुसंवादाचे कौतुक करताना म्हटले, 32 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अनेक जिल्ह्यांत काम केले, पण अधिकार्यांचा असा सन्मान पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे. जिल्ह्यात विकासाची मोठी संधी आहे, आणि त्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.




