‘अतिथी देवो भव’ही भारतीय परंपरा आहे. अडलेल्याला मदत करणे हा मानव धर्म आहे असेही मुलांना शिकवले जाते. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करुन त्यांचा आदर राखावा असे संस्कार लहानांवर जाणीवपूर्वक करण्यावर घरातील ज्येष्ठांचा भर असतो. त्याच परंपरेचा आणि मानव धर्माचा पाईक होण्याचा प्रयत्न मुंबईमधील दोन तरुणांनी केला. मुंबईतील खार या उपनगरात ही घटना घडली. एक कोरियन पर्यटक या परिसरात फेरफटका मारत होती. चालता चालता यूट्यूब लाईव्ह करत होती. अचानक दोन तरुण तिची छेड काढायला लागले. त्यांनी तिला जबरदस्तीने त्यांच्या गाडीवर बसवण्याचा प्रयत्न देखील केला. या घटनेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरुच होते. अथर्व नावाच्या एका तरुणाने ते लाईव्ह पाहिले. त्याने ताबडतोब त्या तरुणीच्या मदतीसाठी धाव घेतली. आदित्य नावाच्या दुसर्या एका युवकाने ते लाईव्ह पोलीसांपर्यंत पोहोचवले. पोलीसांनीही योग्य ती कार्यवाही केली. हे दोन तरुण एवढे करुन थांबले नाहीत. या घटनेच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. कोरियन तरुणीने त्यांचे विशेष आभार मानले आहेत. तरुणांनी त्यांच्या कृतीतून भारतीय परंपरेचा आदर्श समाजासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला. अन्यथा अनुचित घटनांकडे डोळेझाकच केली जाते असे आजवरचा अनुभव आहे. असंख्य लोकांसमोर एखाद्याला अमानुष मारहाण केली जाते. तरुणींची छेड काढली जाते. ज्येष्ठांना त्रास दिला जातो. अरेरावी आणि उर्मटपणा केला जातो. भर गर्दीत तरुणीवर अत्याचारही घडतात. पण माणसे मात्र त्यावर चुप्पी साधतांना आढळतात. अर्थात, यात त्या माणसांचा दोष आहे असे सरसकट मानणे योग्य ठरणार नाही. त्यात्या वेळची परिस्थितीही त्याला कारण असू शकते. अशा घटनांमध्ये पीडितांना मदत केली तर पोलीसांचा आणि कोर्टाचा ससेमिरा मागे लागतो आणि गुंड त्रास देतात अशी असुरक्षिततेची भावना समाजात आढळते. अशा प्रसंगी ती भावना वरचढ चढते आणि माणसे बघ्याची भूमिका घेतात. त्या दोन तरुणांनी मात्र तसे केले नाही. उपनगरातील त्या रस्त्यावर माणसे नव्हती का? पीडित तरुणीला मदत करावी असे त्यापैकी फक्त या दोघांनाच का वाटले? हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील चांगूलपणा असणार. त्यांच्याही मनात असुरक्षिततेची भावना नसेल का? पण त्यांच्यातील चांगूलपणा आणि मानवतेची भावना वरचढ ठरली. त्याचे श्रेय त्यांचे पालक, आजूबाजूचे वातावरण, त्यांचे गुरुजन आणि त्यांच्या मित्र या सगळ्यांमुळे त्यांच्यावर घडलेल्या संस्कारांना देता येईल. त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर माणूसपणाचे संस्कार केले असावेत. त्यांनी चांगला माणूस घडावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असावेत. यानिमित्ताने समाजमाध्यमांची चांगली बाजूही लोकांच्या लक्षात आली. समाजमाध्यमांवर सतत आक्षेप घेतले जातात. समाजमाध्यमांवर सगळेच वाईट नसते. समाजमाध्यम सुरु होते म्हणूनच ही अनुचित घटना लोकांपर्यंत पोहोचू शकली. या माध्यमांवर चांगलेही बरेच काही घडत असते. माहिती प्रसारित होत असते. पण या सगळ्याचा वापर कसा करायचा हे त्या-त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर अवलंबून असते. जनसामान्यांना शिक्षित करण्याचेही प्रयत्न या माध्यमांवर घडतात हेही समाजासमोर आले. कवी अनिल त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही
संवेदना सार्या जगाची, हृदयात आहे भरभरून
नाते नवीन असे काही, जोडून आहोत आम्ही
मानव तेही मानव आम्ही..
मुलांवर मानवतेचे संस्कार घडत राहोत आाणि माणसातील माणूसपण असेच वाढत जावो. त्यातच समाजाचे भले दडले आहे हेच या घटनेचे सार आहे.