वडोदरा । Vadodara
गुजरातच्या वडोदरा शहरातील करेलीबाग परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने कार चालवत स्कुटीस्वार महिलांना उडवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने मद्यधुंद चालकाला गाडीतून ओढून त्याला मारहाण केली.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सार्वजनिक रस्त्यावरून दोन महिला स्कुटीवरून जात असताना, एका काळ्या रंगाच्या कारने भरधाव वेगाने धडक दिल्याचे स्पष्ट दिसते. या धडकेत महिला काही फुटांवर उडून पडल्या. अपघातानंतर नागरिकांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली व चालकाला बाहेर ओढून त्याला चोप दिला. या अपघातात हेमालीबेन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 वर्षीय जैनी, 35 वर्षीय निशाबेन, 10 वर्षांचा एक मुलगा आणि 40 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
ही गाडी प्रांशू चौहानच्या मालकीची असून अपघातावेळी त्याचा मित्र रक्षीत चौरासिया गाडी चालवत होता. रक्षीत हा मध्यप्रदेशमधील रहिवासी असून तो वडोदरा येथील एमएस विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करत आहे. अपघातावेळी तो आणि प्रांशू दोघेही मद्यधुंद होते. तब्बल 100 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत त्याने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.
अपघातानंतर प्रांशू चौहान घटनास्थळावरून पळून गेला. तर, गाडी चालवणारा रक्षीत चौरासिया गाडीतून बाहेर येताच “अन अदर राऊंड, अन अदर राऊंड निकिता” अशी विचित्र घोषणा देऊ लागला. त्यानंतर जमावाचा रोष पाहून तो “ओम नमः शिवाय” च्या घोषणाही देऊ लागला. त्याच्या या असंवेदनशील वर्तनामुळे नागरिक अधिक संतप्त झाले.
संतप्त नागरिकांनी चालकाला अडवून ठेवले असताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालक रक्षीत चौरासियाला अटक केली असून त्याचा मित्र प्रांशू चौहान फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांनी या बेजबाबदार कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे मद्यधुंद वाहनचालकांमुळे वाढणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस तपास सुरू असून आरोपींवर कडक कारवाई होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.