अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गुंडेगाव (ता. अहिल्यानगर) येथे जुन्या वादातून एका तरूणावर चाकू व लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना 22 जून रोजी दुपारी घडली. बळीराम देविदास शिंदे (वय 30 रा. गुंडेगाव) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या खुनानंतर अवघ्या चार तासांत अहिल्यानगर तालुका पोलिसांनी संशयित आरोपींना पारनेर तालुक्यातील सुपा ते शहाजापुर परिसरातील डोंगरात पाठलाग करून सिनेस्टाईलने अटक केली.
बळीराम याचे राहुल दिलीप राऊत, डॅनियल येशुदास जावळे (दोघे रा. गुंडेगाव), व अमोल चंद्रकांत भुजबळ (रा. वडगाव तांदळी, ता. अहिल्यानगर) यांच्याशी पूर्वी वैमनस्य होते. रविवारी बळीराम आपल्या स्विफ्ट कारमधून गावातील छत्रपती चौक येथे किराणा घेण्यासाठी व आई-वडिलांना आणण्यासाठी गेला असता, संशयित आरोपींशी वाद झाला. वाद वाढताच संशयित आरोपींपैकी एकाने बळीरामवर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत तो नगरला निघाला, मात्र संशयित आरोपींनी डॅनियलच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग सुरू केला.
गुंडेगाव ते देऊळगाव सिध्दी रस्त्यावर संशयित आरोपींनी बळीरामचे वाहन अडवून त्याला वाहनातून खेचून बाहेर काढले. त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर आणि तोंडावर चाकूने वार केले. लाकडी दांडक्याने मारहाण करत कारवर दगडफेकही करण्यात आली. नंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. नागरिकांनी तातडीने रूग्णवाहिका बोलावून बळीरामला जिल्हा रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याबाबत मयताचा भाऊ लक्ष्मण शिंदे यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी राहुल दिलीप राऊत, डॅनियल येशुदास जावळे व अमोल चंद्रकांत भुजबळ यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. खुनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सुचना केल्या व संशयितांना अटक करण्यात यश आले.
तिघे संशयित तात्काळ गजाआड
संशयित तिघे गोव्याकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने सहायक निरीक्षक गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबा खेडकर, सागर मिसाळ यांच्या पथकाने पाठलाग करत सुपा-शहाजापूर रस्त्यावरील डोंगरात संशयित चारचाकी आढळल्यावर संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते वेगवेगळ्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात वापरलेली वाहन जप्त करण्यात आले आहे.




