नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक शिक्षक व शैक्षणिक संस्था सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘देशदूत’कडून शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
उद्या शनिवारी (दि. ९) मान्यवरांच्या हस्ते विविध शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत, लेखक रावसाहेब कसबे आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे या अतिथींच्या हस्ते पाच शिक्षकांना विशेष गुरू सन्मान, तर तेरा शिक्षकांना ‘गुरू सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
नासिक्लब, नंदिनी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड येथे सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम पार पडणार आहे. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते. आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारे अगणित शिक्षक आहेत. तरीही प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने जास्त प्रेरित होऊन कृती करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही हे प्रोत्साहन ठरते.
आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो, आपल्या कार्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे ही भावनाही सुखावून जात असते. अशा कर्तव्यनिष्ठ शिक्षकांंच्या तळमळीला आणि उत्कटतेला सलाम करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी, या उद्देशाने ‘गुरु सन्मान पुरस्कार’ आयोजित करण्यात आला आहे.





