Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनिफाडचा सुवर्णकाळ गुरुदेव कांदे परत आणणार : दत्तू बोडके

निफाडचा सुवर्णकाळ गुरुदेव कांदे परत आणणार : दत्तू बोडके

निफाड । प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाआघाडीचे उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी विधानसभा निवडणूक कार्यक्रम लागण्याच्या दोन महिने अगोदरच निफाड तालुक्यात आपल्या प्रचाराचा शुभारंभ करून दिला होता. आजी-माजी उमेदवारांपेक्षा त्यांची तालुक्यातील मतदार भेटीची एक फेरी पूर्ण होऊन आता ते परत दुसरा तालुका दौरा करत मतदार राजाच्या भेटीगाठी घेत असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांनी दिली.

महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होताना जी परिस्थिती आपण बघितली त्या तुलनेत परिवर्तन महाशक्तीच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गुरुभाऊ कांदे यांची उमेदवारी बच्चूभाऊ कडू यांनी 18 सप्टेंबर रोजी जाहीर करून दिली होती. त्यामुळे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच प्रचाराचा पहिला टप्पा उमेदवार गुरुदेव कांदे आणि कार्यकर्त्यांच्या वतीने पूर्ण करण्यात आलेला होता. खरेतर निफाड तालुक्यातील जनतेला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एकच विनंती आणि आवाहन आहे, आपण मतदानाला जाईपर्यंत फक्त पाच मिनिटे डोळे बंद करून मतदारसंघातला आणि आमदारांच्या कामांचा चांगल्या पद्धतीने विचार करावा.

या वीस वर्षांत विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांची दहा वर्षे आणि अनिल कदम यांची दहा वर्षे. या वीस वर्षांत तालुक्यातील विकासासाठी नवीन कोणत्याही क्षेत्रातील एकतरी प्रकल्प मंजूर करून आणला का? शिक्षण, आरोग्य, कृषी, औद्योगिक, रोजगार, सिंचन यासंबंधित कोणताही प्रकल्प मंजूर करून या लोकप्रतिनिधींनी आणलेले नाही. याउलट वीस वर्षांत निफाड तालुक्याला देशाचा कॅलिफोर्निया समजत होते तो यांनी उजाड करून टाकलेला आहे. दोन्ही साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत. ऊस ऊत्पादक शेतकरी, सभासद शेतकरी, कामगार यांना बरबाद करण्याचे पाप यांनी केले आहे. दोन्ही आमदार अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर आळीपाळीने संचालक म्हणून राहतात. आज जिल्हा बँकेचे अवस्था ही दोन्ही साखर कारखान्यांसारखी झाली आहे.

जर सरकारकडून 700 ते हजार कोटींचा निधी जर बँकेसाठी आणला असता तर आज जिल्ह्यातल्या लाखो शेतकर्‍यांना आधार मिळाला असता. शेतकर्‍यांची जीवनदायी जिल्हा बँक सुरळीत चालू राहिली असती आणि ठेवेदारांचे पैसे देता आले असते. पण यांना शक्य झाले नाही. शेतकर्‍यांच्या मुलांना शेतीवरच काम करावे लागत आहे.

शिक्षणाचे, उच्चशिक्षणाचे कुठले मार्ग नाहीये. अनेक राष्ट्रीय महामार्ग निफाड तालुक्यातून जात असूनही त्याचा निफाड तालुक्यातील नागरिकांना कुठल्याही प्रकारे फायदा नाही. पिंपळगाव टोलनाक्यावर निफाड तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट चालू आहे, पण या गोष्टीकडे आजी-माजी आमदारांना लक्ष द्यायला वेळ नाही.

पूर्वी निफाडजवळ रेल्वे आली तर मळीचा वास यायचा आणि साखर कारखाना चालू आहे हे रेल्वे प्रवाशांना समजायचे आणि प्रवाशांनाही त्यावेळेस एक साखर कारखाना चालू असा अभिमान वाटायचा. परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांत मळीचा वासही नाही, साखरही नाही. या पूर्ण देशात नव्हे तर जगात निफाड तालुक्याचा जो साखरेचा गोडवा होता तो लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे संपून गेला आहे. तेच द्राक्षांच्या माध्यमातून झाले आहे. देशात आणि जगात देशाला परकीय चलन मिळवून देणार्‍या या पिकाला आज अवकाळी पाऊस, शेतीची चुकीची धोरणे आणि ज्यावेळेस द्राक्ष उत्पन्न चांगले त्याच वेळेस कमी भावाने द्राक्ष विकली जातात. बाहेरच्या राज्यातील अनेक व्यापारी शेतकर्‍यांचा माल घेऊन आणि पैसे बुडवून निघून जातात. सरकारची सुरक्षा नाही. अशाप्रकारे निफाड तालुक्यातील शेतकर्‍यांची वाताहत होत आहे. तरीही दोन्ही आजी-माजी आमदार याकडे लक्ष देत नाही ही गंभीर बाब आहे.

नाशिक-संभाजीनगर मार्गाची निफाड परिसरात एवढी भयंकर अवस्था आहे की प्रवाशांना, वाहनधारकांना विंचूर ते पिंपळस रामाचे इथपर्यंत प्रवास करताना जीव नकोसा होतो. परंतु हे दोन्ही आमदार पिंपळगाव-ओझर या भागात राहायला असल्यामुळे त्यांना निफाड परिसरातल्या, गोदाकाठ परिसरातल्या नागरिकांशी काही घेणेदेणे नाही, असे स्पष्ट दिसून येते. म्हणतात ना भाकरी का करपली, तर ती फिरवली नाही. घोडा का अडला तर फिरवला नाही. म्हणून तशीच काहीशी गत निफाड तालुक्याचा विकास का थांबला? तर नवीन उमेदवाराला संधी दिली नाही म्हणूनच. त्यामुळे यावेळेस जनतेने परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आदर्श आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराचे उमेदवार गुरुभाऊ कांदे यांना जर निवडून दिले तर एका वर्षाच्या आत कृषी, पर्यटन धोरण, नवनवीन कृषी प्रकल्प आणले जाईल.

खासगीत नाहीतर सहकारात निसाका, रासाका साखर कारखाने चालू करता येतील. जिल्हा बँकेला नव्याने मदत करण्यासाठी प्रयत्न करून शेतकर्‍यांना दिलासा देता येईल. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, शासकीय वैद्यकीय कॉलेज मंजूर करण्यासाठी प्रयत्न करता येईल. आशिया खंडातील या दोन बाजारपेठा आहेत. लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि निफाड यादृष्टीने सर्व ठिकाणी चौपदरी रस्ते करून शेतकर्‍यांचा कांदा, टोमॅटो व अन्य शेतमाल ने-आण करण्यासाठी चांगले चौपदरी रस्ते आणि चांगल्या सुविधा करण्यात येतील. शेतकर्‍यांचा माल घेऊन कोणी व्यापारी पळून जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल.
ओझर येथील एच.ए.एल. कारखान्याची परिस्थिती ही भीषण होत चालली असून स्थानिक कामगारांना काम नाही. तसेच प्रकल्पाची वाढ व्हायला पाहिजे होती. ती वाढ होताना दिसून येत नाही.

याअगोदरही लढाऊ मिग विमानांचे पार्ट बनवण्याचे जे काम एच.ए.एल.ला देण्यात येणार होते परंतु केंद्र सरकारने हेच काम एका व्यक्तीच्या कंपनीला दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि याविरोधात या दोन्ही आमदारांनी कधी आवाज उठवला नाही. हीच एक मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे भविष्यात एच.ए.ए.ला मोठे काम मिळावे आणि स्थानिक कामगारांनाच काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील. याअगोदरही गुरुदेव कांदे यांनी पंचायत समिती उपसभापतिपदाची जबाबदारी सांभाळताना तालुक्यात चांगल्या प्रकारची कामे केलेली आहेत. त्यामुळे जनता समाधानी आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, उपसभापती म्हणून काम करत असताना शेतकर्‍यांसाठी त्यांनी चांगले काम केलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी गुरुदेव कांदे यांच्यावर समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठिकठिकाणी तालुक्यात प्रचार करताना या दोन्ही आमदारांची नाराजी अनेक ठिकाणी मतदार बोलून दाखवत आहेत. गुरुदेव कांदे यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे आणि स्वतः केलेले काम आणि कामाची पद्धत आणि प्रहार जनशक्ती पक्षाला मानणारे शेतकरी, दिव्यांग यांचे मतदान बघता गुरुदेव कांदे हे नक्कीच या निवडणुकीत निवडून येतील आणि ज्या पद्धतीने बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्र राज्यात विधानसभेत काम केलेले आहे त्याच पद्धतीने या निफाड तालुक्यात काम होईल आणि निफाड तालुका पुन्हा एकदा गुरुदेव कांदे यांच्या रूपाने आपण देशात नव्याने निफाड तालुक्याला कॅलिफोर्निया करण्याचा नव्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या