राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या गुटखा विक्रीच्या रॅकेटच्या बाबत दैनिक सार्वमतमध्ये भांडाफोड झाल्यानंतर तथाकथित राहुरी खुर्दच्या तालुका वितरकाला 5 जुलैपर्यंत आहे तो स्टॉक संपवण्याबाबत संबंधित यंत्रणेने परवानगी दिल्यानंतर सदर तालुका डीलरने सर्व स्टॉक संपवून आपले गोदाम वरिष्ठांचा आदेश येईपर्यंत रिकामे करून ठेवल्याची माहिती काही व्यापार्यांकडून समजते.
पोलीस खात्याने सध्या वातावरण चांगले नसल्याने हा व्यावसाय बंद ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र, सदर व्यापार्याने संबंधित शासकीय यंत्रणेला महिन्याची बिदागी पोहोच केल्याने माझा तोटा व्यवसायात होत असल्याने लवकरात लवकर याबाबत परवानगी द्यावी, अशी विनंती केल्याचे समजते.
तरीही राहुरीतील व खेड्यापाड्यातील छोट्या मोठ्या दुकानांमध्ये विक्री सुरूच असल्याचे दिसून येते. याबाबत आतातरी संबंधित यंत्रणेने आपले हात ओले करून घेण्यापेक्षा बरबाद होणार्या तरुणाईचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून योग्य ती कारवाई करावी व या गुटख्याच्या विळख्यातून राहुरीला सोडविण्यासाठी वरिष्ठांनी तातडीने या तालुका वितरक व गावागावातील वितरकांवर कारवाई करावी, अशी मागणी राहुरीतील नागरिकांतून होत आहे याबाबत खालील यंत्रणेकडून वरिष्ठांना आम्हाला तोंड द्यावे लागते, असे सांगून त्यांनाही आम्हाला बिदागी पोहोच करावी लागेल, असे सांगून मोठी रक्कम या रॅकेट कडून वसूल होत असल्याची ही माहिती याच धंद्यातील छोट्या- मोठ्या व्यापार्यांकडून समजते. मग नेमके कोणा- कोणाची याला साथ आहे? याबाबत सखोल केली जाण्याची गरज व्यक्त होत आहे.