शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी शहर गुन्हेगारीला आळा बसविण्यात यश मिळवले असून बुधवारी शिर्डी पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करत चार लाख रुपये किमतीचे गुटख्याचे 1242 बॉक्स आरोपीच्या घरातून जप्त केले असून शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी शिर्डी पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एअर पोर्ट रोडवर असलेल्या गणेशवाडी परिसरातील आशिष खाबिया यांच्या आनंद निवास्थानी छापा टाकत पावणे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. यावेळी घरातील हॉलमध्ये हिरा पान मसाला, आर.एम.डी, डायरेक्टर अशा विविध कंपन्यांचे एकूण 1242 बॉक्समध्ये विविध प्रकारचा गुटखा मिळून आला आहे. पोलिसांनी हा गुटखा हस्तगत केला असुन आरोपीस अटक करण्यात अली आहे.
या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा असल्याचे समजते.
यामध्ये कारवाई जरी प्रत्यक्षात आरोपी खाबिया याच्यावर करण्यात आली असली तरी यामागील मुख्य सूत्रधार शिर्डी शहरातील दुसराच असल्याची चर्चा आहे. गणेशवाडी परिसरात गजबजलेल्या मध्यवर्ती रहिवासी भागात एवढया मोठ्या प्रमाणात घरामध्ये अशाप्रकारे अवैध गुटखा आढळून आला असुन या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि अहिल्यानगर अन्न औषध प्रशासन विभागाचे श्री. बढे करीत आहे.