जामखेड । तालुका प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील धनेगाव येथून १९ लाखांचा गुटखा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्रात राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित पान मसाले, सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने २६ फेब्रुवारी २०२५ रोजी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे. विक्री प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता धनेगाव गावच्या शिवारात ही घटना घडली असून आहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने विक्री प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेला माल जप्त केला आहे. यामध्ये हिरा पान मसाला व रॉयल ७१७ सुगंधित तंबाखू यांचा समावेश होता.
जप्त केलेल्या मालाची किंमत १९ लाख ५३ हजार ६२० रुपये आहे. यातील फिर्यादी पो.कॉ.रोहित मिसाळ यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरोधात भा.न्या.सं.का. कलम १२३,२२३, २७४,२७५ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत
खर्डा शहरात सर्रासपणे महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित पान मसाले, सुगंधित तंबाखू विक्री होत असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून युवकांच्या भविष्याकरिता खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात यावी अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे