अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गुटखा आणि सुगंधी तंबाखूची चोरटी वाहतूक करणार्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. गजानन कॉलनी ते वडगाव गुप्ता रस्त्यावरील वैभव क्लिनिकसमोर सापळा रचून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 81 हजार 380 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार विष्णू भागवत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद आजीम बाबू कुरेशी (वय 46, रा. झेंडीगेट) याला ताब्यात घेतले असून, त्याचे साथीदार साजिद पठाण, मोहम्मद फारमन आणि अमोल (पूर्ण नाव माहिती नाही) हे तिघे पसार झाले आहेत. चौघांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमवारी (12 जानेवारी) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दुचाकीवरून गुटख्याची विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गर्शनाखाली पथकाने गजानन कॉलनी ते वडगाव गुप्ता रस्त्यावरील वैभव क्लिनिकसमोर सापळा रचून संशयित दुचाकी व मोहम्मद कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विमल गुटखा, तंबाखू आणि दुचाकी असा एकूण 81 हजार 380 रूपयांचा माल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पसार संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.




