मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यात गेल्या वर्षभरात १५० कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बोलताना दिली. गुटख्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चांदिवली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुटखा तसेच अंमलीपदार्थ विक्री होत असल्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी आज लक्षवेधी मांडली होती. या गुटखा विक्रीकडे पोलीस सर्रास दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. तर राज्यात गुटखा बंदी असतानाही परराज्यातून गुटखा आणून त्याची इथे विक्री सुरू आहे. मात्र सरकार त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी या चर्चेत सहभागी होताना केला.
राज्यात बंदी गुटखा असताना मात्र तो सगळीकडे उपलब्ध आहे. गुजरातमार्गे महाराष्ट्रात गुटखा येताना कारवाई होत नाही. पोलिसांनी मनात आणले तर गुटख्याची एकही पुडी विकली जाणार नाही. विदर्भ, मराठवाडा इथे गुटखा मिळतो. लोकांच्या आरोग्याला यामुळे हानी पोहचते, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
या चर्चेला उत्तर देताना योगेश कदम यांनी गुटख्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाला असल्याचे सांगितले. या विभागात अन्न निरीक्षकांची कमतरता आहे. पण दोन महिन्यात या नियुक्त्या करण्यात येतील आणि गुटखा विक्रीच्या विरोधातील कारवाया वाढतील. गुटख्याबाबत कोणताही व्यापारी, विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कठोर कारवाई करणार असे कदम म्हणाले.