धुळे ।Dhule । प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) सोनगीर गावानजीक सरवड शिवारात (Sarvad Shivara) एलसीबीच्या पथकाने (team of LCB) परराज्यातून धुळे मार्गाने मुंबईला जाणारा 20 लाख 47 हजार 200 रुपये किंमतीचा प्रिमीयम राजनिवास सुगंधी पानमसाला गुटखा (Gutkha) दहा लाखांचा आयशर आणि दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 30 लाख 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of goods) केला. याप्रकरणी मध्यप्रदेशच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
इंदूर ते भिवंडी असे धुळे मार्गाने एम.पी.09 जी.एच.8691 क्रमांकाच्या आयशरमधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पीआय हेमंत पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर गावानजीक सरवड शिवारात एलसीबीने सापळा लावला.
सरवड फाटा येथे आयशर येताच एलसीबीच्या पथकाने त्याला थांबविले. चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बहादूर अंबाराम मावी (वय 21 रा.उमरपुरा जि.धार) आणि सहचालक कमल रमेश दांगी (वय 20) रा. मियापूरा जि.धार (मध्यप्रदेश) असे सांगितले. ट्रकमधील मालाबाबत विचारले असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे एलसीबीने आयशरची तपासणी केली. या तपासणीत 20 लाख 47 हजार 200 रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत असलेला प्रिमीयम राजनिवास सुगंधी पानमसाला आढळून आला. पोलिसांनी हा पानमसाला, दहा लाखांचा आयशर आणि दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 30 लाख 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी एलसीबी पीआय हेमंत पाटील व त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील,अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय हेमंत पाटील,पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, हे.कॉ.रफिक पठाण, पोना योगेश चव्हाण,पो.कॉ.सागर शिर्के,राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.