धुळे – प्रतिनिधी dhule
शहरातील अकबर चौकातील फ्रुट मार्केटमागील एका दुकानामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक (Assistant Superintendent of Police) एस.ऋषीकेश रेड्डी यांनी छापा टाकून प्रतिबंधित पानमसाला, गुटख्याचा 51 हजार रूपयांचा साठा जप्त केला. तसेच एकाला ताब्यात घेतले.
ही कारवाई आज दि.4 रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. आरीफ कच्छी (रा.मेमन कॉलनी, वडजाई रोड, धुळे) असे आरोपीचे नाव आहे. आज सकाळी सव्वा दहा वाजता सहा. पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शहरातील अकबर चौक, फ्रुट मार्केटमागील एका दुकानामध्ये पोलीस पथकासह छापा टाकला. तेव्हा आरीफ कच्छी याच्याकडे 6 हजार 200 रुपये रोख व 51 हजार रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला विमल, रजनीगंधा, राजनिवास कंपनीचा सुगंधित पानमसाला गुटख्याची पाकिटे मिळुन आली.
मुद्देमालासह आरोपीला पुढील कारवाईसाठी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी, पोसई. आर. ए. पवार, पोहेकॉ आरीफ शेख, यु.डी.सुर्यवंशी, विवेक वाघमोडे, सुशिल शेंडे, कबीर शेख, कर्नल बापु चौरे,चंद्रकांत पाटील, रमेश उघडे, सोनाली बोरसे यांनी केली.
धुळे शहरात काही अवैध धंदे सुरु असल्यास त्याबाबत माहिती कळवावी. आपले नाव गोपनिय ठेवण्यात येईल व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही सहा. पोलीस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांनी केले आहे.