शहादा Shahada । ता.प्र.-
राज्यात वाहतूक व विक्रीस प्रतिबंध असलेल्या विमल गुटखा (Gutkha) व विविध प्रकारच्या सुगंधित पानमसाला तस्करांवर (smugglers) पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दोन ठिकाणी कारवाई (action) करत सुमारे 4 लाख 22 हजार 240 रुपयांचा गुटखा जप्त ( Gutkha seized) केला आहे. याप्रकरणी तिघां विरोधात शहादा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात विमल गुटखा, सुगंधित पान मसाला वाहतूक विक्रीला राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे. असे असले तरी मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात या गुटक्याची तस्करी राजरोसपणे सुरू असून सर्रासपणे शहरात थोड्या थोड्या अंतरावर गुटख्याची विक्री होत आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पदभार स्विकारल्यानंतर काल दि.20 रोजी दुपारी शहादा-दोंडाईचा रस्त्यावर कल्याणी डेअरीसमोर विमल गुटख्याची वाहतूक करणार्या योगेश गुलाब भोई व प्रकाश गुलाब भोई यांच्या ताब्यातून विक्री करीत असलेला सुमारे 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे.
दुसरी कारवाई शहरातील मेमन कॉलनी परिसरात एका गोदामावर केली असून तेथून सुमारे 3 लाख 20 हजार 63 रुपयांचा विमल गुटखा व इतर विविध कंपन्यांचे सुगंधित पान मसाला जप्त केला आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत, पोलीस नाईक किरण पावरा, पोलीस शिपाई किरण जिरेमाळी हे शासकीय वाहनाने शहरात पेट्रोलिंग करत असताना यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी संबंधित अधिकारी कर्मचार्यांना माहितीची खात्री करून तपासणी करायला लावले. त्यावेळी त्या ठिकाणी मुद्देमाल सापडला. दोन कारवाईत सुमारे 3 लाख 92 हजार 303 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
पोलीस शिपाई भरत उगले यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात संशयित तौसिफ रफिक मेमन (वय 28, रा.मेमन कॉलनी, शहादा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.
दरम्यान, शहादा पोलिसांनी अचानक विमल गुटखा व तत्सम सुगंधी तंबाखू तस्करांवर कारवाईचे सत्र सुरू केल्यानंतर गुटखा तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक तस्कर शहरातून फरार झाल्याची चर्चा आहे. अनेकांनी त्यांच्या ताब्यातील गुटखा शहराबाहेर सुरक्षित स्थळी हलविला असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी केवळ नाममात्र म्हणून गुटखा तस्करांवर कारवाई न करता यामागील मास्टर माइंड प्रमुख सूत्रधाराला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गुटखा तस्करांनी माजविलेला थैमान कायमस्वरूपी मोडून काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.