अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भिंगारमध्ये अयोजित करण्यात आलेल्या महात्मा फुले जयंती मिरवणुकीत कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या दोघांना भिंगारमधील वडारवाडी परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि. 13) भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
निलेश सुनील पेंडुलकर (रा. पाटील गल्ली, भिंगार), अभिषेक उर्फ अभ्या अशोक शेलार (रा. घासगल्ली, भिंगार) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 11 एप्रिल 2023 रोजी रात्री भिंगार शहरात महात्मा फुले जयंती निमित्त मिरवणुकीचे अयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीदरम्यान निलेश पेंडुलकर, अभिषेक उर्फ अभ्या शेलार व इतरांनी नाचत असताना फिर्यादी व साक्षीदार यांना जाणून बाजून वाद घालून गैर कायद्याची मंडळी जमवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील पेंडुलकर व शेलार हे भिंगारमधील वडारगल्लीत असल्याची माहिती सहा. निरीक्षक दिनकर मुंडे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला सोबत घेत पेंडुलकर व शेलार यांना ताब्यात घेतले व अटक केली आहे.
सदरची कामगिरी सहा. निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलीस अंमलदार कैलास सोनार, रेवननाथ दहिफळे, संदीप घोडके, दीपक शिंदे, राहुल व्दारके, रमेश दरेकर, अमोल आव्हाड यांच्या पथकाने केली आहे.