Monday, November 25, 2024
Homeब्लॉगBlog : प्रिय मोहीनी…; अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या वाढदिवसाच्या निमित्त

Blog : प्रिय मोहीनी…; अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या वाढदिवसाच्या निमित्त

आज तुमचा वाढदिवस…म्हणजेचं प्रत्येकाच्या आठवणीतील प्रेमाचा दिवस..
आमच्या उमलत्या तारुण्याला पडलेलं एक मुग्धमधुर स्वप्न!
तुम्ही म्हणजे मनमोहक, खळाळत्या हास्याचा धबधबा!
तुम्ही म्हणजे नृत्यनिपुणता, कमनीयता,सौष्ठवता!

तुम्ही म्हणजे तुम्हीच..!!! तुमच्यासारखी दुसरी कुणीही नाही.

- Advertisement -

‘सुहास्य तुझे मनासी मोहे’ हे गाणं केवळ जिच्यासाठीच लिहिलं असावं असं कायम वाटतं ती सुहास्यवदना, कोमलांगी,चारुगात्री म्हणजे तुम्ही…!

सौंदर्य हे अजर असतं, असं म्हणतात. म्हणजेच ते कधी म्हातारं होत नाही. शिवाय ते सौंदर्य जर पाहणाऱ्याच्या नजरेत असेल, तर खरोखरच ते चिरतरुण राहतं. तुम्ही गेल्या मे मध्ये म्हणजेच उद्याला १५ तारखेला वयाचे ५३ वर्ष पूर्ण करत आहात,हे केवळ आकडे झाले.माझ्या लेखी तूम्ही कायमच १९९० मधल्या अवखळ,चुलबुली माधुरी असणार आहात.

याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही माझ्या वडिलधार्यांच्या पिढीची तारका होता.प्रत्येक पिढीची ‘आपली’ अशी एक स्वप्नसुंदरी असते.अगदी मधुबालापासून ते आत्ताच्या दिपिका पदुकोण किंवा विद्या बालनपर्यंत ही यादी सांगता येईल.पण आता पन्नाशीत असलेल्या माझ्या वडिलधार्यांसमोर तुम्ही अवतरला,हे त्यांच भाग्य होय.तुम्ही निखालस ‘नाइन्टीज’ची नायिका होता.

तुमचा पहिला सिनेमा ‘अबोध’ झळकला तो १९८४ मध्ये.तेव्हा तुम्ही फक्त १७ वर्षांच्या होत्या.त्यानंतरही तुम्ही काही फुटकळ सिनेमे केले.मात्र,तुम्ही रातोरात सुपरस्टार झाल्या त्या १९८८ मध्ये आलेल्या ‘तेजाब’मुळे.

चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्रा नावाच्या मराठी माणसानं ‘एक दो तीन…’च्या ठेक्यावर तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीचा विशाल कॅनव्हास मिळवून दिला.
मग प्रेम करण्याचं खरं वेड तर तेव्हापासूनच जास्त सुरू झालं..आयुष्यात एक तरी लाल-रिबीन वाली असावी..!

असं प्रत्येकाला वाटायचं..
कसला उत्साह होता..!
कसली अदाकारी होती..!
कसल्या शिट्या होत्या..!
कसला तो घुगरांचा आवाज होता..!
खरचं प्रत्येकाच्या वाट्याला नाही येत हे टाळ्यांच्या आवाजातील शुभांकुर..!

तुम्ही उत्कृष्ट अदाकारीने प्रत्येकाच्या मना-मनात राज्य केलं आणि नंबर-वन अभिनेत्री झालात.’मोहीनी-मोहीनी’ यातूनच सगळ्याचं मन “मोहीत” केलं..तुमच्या त्या गाण्याने जगाला इतकी भुरळ पाडली की..जिकडे-तिकडे हेचं गाणं असायचं..
प्रत्येकाला “लाल-रिबीन वाली” स्वप्नांची परि दिसायची..

शाळेत “मोहीनी” दिसायची..
गावात “मोहीनी” दिसायची..
एस-टी स्टॅंड वर “मोहीनी” दिसायची..
काहींना भेटली तर काहींना नाही.

काही काही वेड्यांनी तर तुमचा फोटो पाकिटात काय..पॅडवर काय अगदी सगळीकडेच लावला होता..काहींनी तर घरात सुद्धा लावला होता..
खरतर,तुम्ही रूपेरी पडद्यावर राज्य करायला आलात तेव्हा इथं निर्विवाद श्रीदेवींच राज्य होतं.त्यापूर्वीच्या हेमामालिनी, रेखा,झीनत अमान,राखी यांचं राज्य खालसा होत आलं होतं.तुम्हाला खरी स्पर्धा होती ती फक्त श्रीदेवींची.श्रीदेवी एक अत्यंत जबरदस्त अभिनेत्री तर होत्याच;पण शिवाय त्या दाक्षिणात्य,नृत्यनिपुण आणि सौष्ठवपूर्णही होत्या या त्यांच्या आणखी काही जमेच्या बाजू होत्या.

मि.इंडिया,नगीना आणि नंतर आलेल्या ‘चांदनी’नं श्रीदेवींची लोकप्रियता कळसाला पोचली होती.
मात्र,प्रेक्षकांनी ‘तेजाब’च्या वेळी तुम्हाला पडद्यावर पाहिलं आणि त्यांच्या हृदयात कसलीशी कळ उठली.माझ्यासारख्या तेव्हा बालवस्थेत असलेल्या प्रेक्षकांच्या तर नक्कीच!

पुढं इंद्रकुमारांच्या ‘बेटा’नं यालाच शब्दरूप दिलं -‘धक धक करने लगा…’पण ही अवस्था आमची ‘तेजाब’पासूनच झाली होती, हे नक्की.तुमच्यात काही तरी ‘एक्स-फॅक्टर’ होता,म्हणूनच प्रेक्षकांनी तुम्हाला एवढं नावाजलं.तुमचं कोडकौतुक केलं.

अगदी पासष्टी ओलांडलेल्या ‘नाना पाटेकरांपासून’ तुमच्या काळातल्या प्रत्येक तरूणाला माझ्या स्वप्नातली माधुरी मला वास्तवात पण भेटावी..
असं नेहमी वाटायचं.

नानांनी तर त्यांची ही वेदना जाहीर व्यासपीठावर पण बोलून दाखवली होती..!आता मात्र मागं वळून पाहताना असं वाटतं,की तुमच्या चेहऱ्यात एक निरागसता होती आणि तुमचं ते मुक्त,खळाळतं..!

(हेच विशेषण वापरावं लागतंय दर वेळी,पण खरोखर दुसरा शब्दच नाही…) हास्य म्हणजे त्या निरागसतेला लागलेले ‘चार चाँद’च जणू.
सुप्रसिद्ध हास्य कदाचित तो काळ पाहिला,तर असं वाटतं, की समाजातला झपाट्यानं कमी होत चाललेला निरागसपणा तुमच्या रूपानं पुन्हा पाहायला मिळत होता. लहानपणी आपण असे निरागस असतो.प्रत्येक गोष्टीला खळखळून हसत दाद देत असतो.मित्रांबरोबर दंगा-मस्ती करीत असतो. पण जसजसे आपण मोठे होत जातो,तसतसं हे हास्य लोप पावत जातं.निरागसता हरवून जाते.आपण बनचुके, बनेल,अट्टल होऊन जातो. पण आपण आपल्या बालपणातला तो निरागस भाव कुठं तरी ‘मिस’ करीत असतो.आणि मग तो असा तुमच्या हास्याच्या रूपानं पुन्हा समोर आला,की त्याला कडकडून भेटावंसं वाटतं. तुम्ही म्हणजे त्या हरवलेल्या निरागसपणाचं मूर्तिमंत प्रतीक होता..

सामान्य जनतेला तुमच्या हास्यात आपलं हरवलेलं निरागस सौंदर्य सापडलं आणि त्यांनी तुम्हाला एकदम सुपरस्टार करून टाकलं. तुमच्या निरागस व मुग्धमधुर हास्यानं प्रेक्षकांवर जी ‘मोहिनी’ घातलीय, ती अद्याप एवढ्या वर्षांनंतरही उतरायला तयार नाही,याचं एकमेव कारण म्हणजे त्या तुमच्या हास्याचा प्रेक्षकांच्या हरपलेल्या निरागसतेशी असलेला हा ‘कनेक्ट’ होय.

तुम्ही खूप वेगळ्या होत्या,त्या अजून एका कारणानं..!
तुम्ही इतर काही नट्यांसारख्या बालपणापासून सिनेमासृष्टीत आलेल्या नव्हत्या किंवा तुमचं शिक्षणही अर्धवट राहिलेलं नव्हतं.तुम्ही रीतसर बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजीची पदवी संपादन करत होता.खरं तर तुम्हाला त्याच क्षेत्रात पुढं काही तरी करायचं होतं.पण नियतीला कदाचित ते मंजूर नव्हतं.मध्यमवर्गीय घरातली ही तरुणी केवळ मध्यमवर्गीय आयुष्य कधीच जगणार नव्हती.पुढं तिला भारतातल्याच नव्हे,तर जगभरातल्या रसिकांच्या मनातलं ड्रीमगर्ल स्टेटस मिळणार होतं.

‘तेजाब’नंतर तुमचा आमिर खानांसोबत केलेला ‘दिल’ही प्रचंड गाजला. ही एक सरधोपट प्रेमकहाणीच होती.पण चॉकलेट हिरो आमिर खान आणि तुम्ही मोहिनी यामुळं इंद्रकुमारांना मटकाच लागला.आम्ही तुमच्या एवढे प्रेमात होतो,की एक्स्ट्रीम क्लोजअपमध्ये तुमच्या चेहऱ्यावर दिसणारी मुरमंही आम्हाला दिसत नव्हती. ‘तेजाब’च्या यशानंतर तुमचे आणी अनिल कपूरांचे अनेक सिनेमे आले.जीवन एक संघर्ष,किशन-कन्हय्या वगैरे. पण त्यात सर्वाधिक लक्षात राहिला आणि गाजला तो ‘शोमन’ सुभाष घईंचा ‘राम-लखन’…

या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर तुम्हा दोघांची(अनिल कपूर-माधुरी दिक्षीत) जोडी सर्वांत ‘हिट अँड हॉट’ जोडी ठरली. थोड्यात काळात तुम्ही जवळपास सुपरस्टार नायिका झालात.त्याच्या पुढच्याच वर्षी आलेल्या लॉरेन्स डिसूझांच्या ‘साजन’नंही प्रचंड यश मिळवलं.सलमान खान आणि संजय दत्त या दोघं बड्या नायकांसमोर लक्षात राहिल्या त्या तुम्हीच.

तुम्ही नृत्यनिपुणता या चित्रपटात विशेष झळाळून दिसल्या. तुमच्यातल्या सुंदरीला १९९१ मध्ये आलेल्या ‘प्रहार’मध्ये विनामेकअप कॅमेऱ्यासमोर उभं केलं ते नाना पाटेकरांनी. पीटरवर (गौतम जोगळेकर) मनस्वी प्रेम करणारी शर्ली तुम्ही फार आत्मीयतेनं साकारली.

अक्षरश: एका सीन साठी तुम्ही १२० रिटेक दिले..याच मेहनतीच्या जोरावर तुमच्यातले अभिनयगुण सुद्धा प्रकर्षानं दिसले.
त्यांच्या कॅमेऱ्यातून तुमचं सौंदर्य अधीक खुललं..

तुम्ही विनामेकअप सुद्धा अत्यंत सुंदर दिसल्या आणि नैसर्गिक सौंदर्याला बाह्य सजावटीची गरज नसते, हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित करून दाखवलं.’दिल’च्या यशानंतर इंद्रकुमारांनी तुमच्या दोघांच्या(अनिल कपूर-माधुरी दिक्षीत) सुपरहिट जोडीला घेऊन पुढचा सिनेमा आणला ‘बेटा’.या सिनेमानं तूमच्या सम्राज्ञीपदावर निर्विवाद शिक्कामोर्तब केलं.

आधीच्याच वर्षी यश चोप्रांच्या ‘लम्हें’मधून श्रीदेवींनी अप्रतिम भूमिका केली होती.पण तूम्ही ‘बेटा’मधून जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मग तुम्हा दोघींच्या या तीव्र स्पर्धेचा पुढच्या दोनच वर्षांत फैसला झाला.

कुजबुज अशी..
तुमची क्रेझ एवढी वाढली,की संजय कपूरांच्या आणि तुमच्या ‘राजा’नामक एका चित्रपटाचं खरं नाव ‘राणी’ असंच असायला हवं होतं असं लोक नेहमी म्हणायचे.
पुढचं पर्व सुरू झालं..

१९९४ आणि याच वर्षानं तुमच्या सुपरस्टार पदावर मोहोर उमटवली.सूरज बडजात्यांनी ‘हम आप के हैं कौन’मधून सलमान सर आणि तुम्हाला दिमाखात पेश केलं.लग्नाची व्हिडिओ कॅसेट अशी या सिनेमाची समीक्षकांनी संभावना केली असली,तरी तो त्या वर्षीचा नव्हे,तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला तोपर्यंतचा सर्वाधिक हिट चित्रपट ठरला. तेव्हा २९ वर्षांचे असलेले सलमान सर आणि २७ वर्षांच्या असलेल्या तुम्ही..! तुमची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड भावली.

घरगुती कुटुंबात रमणारी, तरीही प्रियकरासाठी क्षणात ‘रसिकमोहिनी’ होणारी सेन्शुअस निशा तुमच्यातल्या गात्रागात्रांतून उभी राहिली. तुम्हाला आठवतयं..
भारतीय पुरुषी मानसिकता अचून हेरून सूरज बडजात्यांनी ‘हम आप के’चं पॅकेज आणलं होतं.ते हिट होणारच होतं.श्रीदेवी हळूहळू फेडआउट होत होत्या,त्यावेळेस तुम्ही या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एकमेव सुपरस्टार नायिका उरल्या होत्या.

तुम्ही एवढं प्रचंड यश मिळवलं तरी तुमच्या अभिनयक्षमतेविषयी काही समीक्षकांना शंका असायची. तुम्ही केवळ सुंदर दिसणं आणि नृत्यनिपुणता याच जोरावर चित्रपटसृष्टीवर राज्य करतात,असं त्यांचं म्हणणं होतं.हे काही अंशी खरंही होतं.अगदी कस लागेल अशा फार कमी भूमिका तुमच्या वाट्याला येत होत्या.

पण त्यांची ही शंका तुम्ही दूर केली ती प्रकाश झा यांच्या १९९७ मध्ये आलेल्या ‘मृत्युदंड’ने.या चित्रपटात तुमची अभिनयक्षमताही दिसून आली.तुमचा झंझावात सुरूच राहिला तो पुढच्या वर्षी आलेल्या यश चोप्रांच्या ‘दिल तो पागल है’मुळं. शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीला असलेल्या तूम्ही या चित्रपटाच्या यशाचा महत्त्वाचा ‘यूएसपी’ होता, यात शंकाच नव्हती.

यशाची ही चढती कमान आणि अपरंपार यश पदरात असतानाच तुम्ही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तो १९९९ मध्ये लग्न करून!
राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात एकाच वेळी लाखो हृदयं अक्षरशः विदीर्ण झाली.  अनिल कपूरांसोबतचा ‘पुकार’ हा तुमचा चित्रपट तुमच्या लग्नानंतर प्रदर्शित झाला. तुम्ही बॉलिवूडमधून एखाद्या धूमकेतूसारख्या निघून गेलात.तुम्ही अमेरिकेत स्थायिक झालात,संसारात रमलात,या सगळ्या बातम्या तुमचे चाहते उदासपणे वाचत होते,ऐकत होते.

पाच वर्षं निघून गेल्यावर अचानक बातमी आली,की संजय लीला भन्साळी शाहरुख सरांना घेऊन ‘देवदास’ बनवतायं आणि ऐश्वर्या पारो आणि तुम्ही ‘चंद्रमुखी’ करतायं.ही बातमी ऐकताच तुमच्या चाहत्यांना अपार आनंद झाला.पुढं भन्साळींनी पडद्यावर आणलेल्या ‘देवदास’बद्दल कितीही वाद-प्रवाद झाले, तरी तुमच्या ‘चंद्रमुखी’नं मात्र सर्वांची हृदयं पुन्हा एकदा काबीज केली, यात कुणालाच संशय नव्हता.
पं.बिरजू महाराजांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली ‘धाई शाम रोक लई’ ही बंदिश स्वतः म्हणत,अफाट नृत्य करीत तुम्ही पडद्यावर चंद्रमुखी साक्षात उभी केली.
२०१८ साली मराठी चित्रपट सृष्टित पदार्पण करून “बकेट लिस्ट”च्या सोबतीने ‘मधुरा सानेच्या’ भुमिकेतून एका चांगल्या गृहीणीची घरातील आणि आयुष्यातील बकेट लिस्ट काय असते हे ही उत्तमरित्या आपल्या चाहत्यांना दाखवून दिले..

तुमच्या या ‘कमबॅक’नं मी अद्याप संपलेली नाही,हेही सिद्ध केलं.लग्नानंतर नट्यांना कामं मिळत नाहीत,हा समजही तेव्हा हळूहळू दूर होत गेला.त्याचा अचूक फायदाही तुम्ही घेतला.

तुमच्या अजर सौंदर्याचं आणि थिरकत्या पायांचं नेहमी कौतुकच झालं..
तुमचं गुणगान गाताना इथं एक सलणारी गोष्ट सांगितलीच पाहिजे.

जन्मानं मराठी असलेल्या तुम्ही मात्र मराठी नाटकांत कधीच काम केलं नाही,ही मराठी रसिकांची खंत आहे.सुयोग नाट्यसंस्थेचे सुधीर भट तुम्हाला घेऊन ‘लग्नाची बेडी’ नाटक पुन्हा रंगमंचावर आणणार आणि तुम्ही ‘रश्मी’ साकारणार,अशी जोरदार चर्चा कित्येक वर्षं ऐकायला येत होती.मात्र,ही कल्पना कधीच वास्तवात उतरली नाही.दुर्गा खोटे, सुलोचनापासून ते स्मिता पाटील,सोनाली कुलकर्णी, ऊर्मिला मातोंडकरांपर्यंत सर्व मराठी अभिनेत्रींनी हिंदीबरोबरच मराठीतही (किंवा मराठीसोबत हिंदीतही) उत्तम कामं केली.

तुम्ही मात्र एकमेव अभिनेत्री आहात,की तुम्ही कधीच मराठी नाटकात काम केलं नाही.अगदी पाहुणी कलाकार म्हणून तोंडी लावण्यापुरतंही नाही! मराठी नाटक दिग्दर्शक-निर्माते तुमच्या बड्या इमेजला टरकून आहेत म्हणावं तर मराठीत अनेक बडे बडे लोक काम करताना दिसतात.तुमची स्वतःची कितपत इच्छा आहे,हे कळत नाही.

तुमची इच्छा असती, तर तुम्ही एव्हाना नक्कीच मराठी नाटकात किंवा अजून एखद्या मराठी चित्रपटात नक्कीच काम केलं असतं.
तुम्ही,नाना,सचिन खेडेकर,सुबोध भावे,सोनाली कुलकर्णी किंवा अश्विनी भावे या सर्वांना एकत्र आणून महेश मांजरेकर किंवा सचिन कुंडलकर किंवा चंद्रकांत कुलकर्णी,नागराज मंजुळे यांसारखे बडे दिग्दर्शक एखादा सिनेमा का नाही तयार करत?

असा सिनेमा भविष्यात तरी तयार व्हावा,असं मनापासून वाटतं. अर्थात चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या तुमच्यारूपातल्या सुंदर,गोड अभिनेत्रीवरचं आमचं प्रेम कायमच राहणार आहे.यापुढंही तुम्ही तुमच्या लाजबाव अदांनी आणि त्या मोहक हास्यानं आम्हाला कायम प्रसन्न ठेवणार,यात अजिबात शंका नाही.

महाराष्ट्राच्या मातीतून घुंगराचं आणि शिट्याचं पर्व गाजवलेल्या रंगमंचावरील दिलखुलास व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा..!!

तुमचाच एक चाहता
आकाश दिपक महालपूरे
रा.गोंदेगाव ता.सोयगाव

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या