८ जुलै १९७२ रोजी कोलकाता येथे भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीचा जन्म झाला. सौरव गांगुली यांच्या वडलांचा प्रिंटींगचा मोठा व्यवसाय होता. त्यामुळे गांगुलीचे बालपण सर्व सुख सोयींनी कसे जाईल याची काळजी गांगुलीच्या वडिलांनी अतिशय योग्य रीतीने घेतली होती.
पश्चिम बंगालमधील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉलकडे सौरव गांगुलीचे सुरुवातीला आकर्षण होते. पण त्याने खेळाकडे लक्ष केंद्रित न करता अभ्यासाकडे करावे अशी इच्छा त्याच्या आईची होती. पण गांगुलीच्या मोठ्या भावाने बंगाल क्रिकेट संघामध्ये त्याचे स्थान पक्के केले होते. त्या नंतर त्याने सौरवला क्रिकेट घेळण्यास प्रोत्साहित केले. उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या वडिलांना सौरावला क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर त्याची यशस्वी वाटचाल सुरू झाली.
१९९०-९१ साळच्या रणजीमधील चांगल्या प्रदर्शनानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. त्यानंतर वेस्ट इंडिज विरूद्ध एकदिवसीय सामन्यात खेळताना त्याने फक्त तीन धावा काढल्या. त्यानंतर त्याला लगेच संघातून काढून टाकण्यात आले. संघातून काढून टाकल्यानंतर गांगुलीने पुन्हा रणजी सामने खेळण्यास सुरवात केली. त्याने १९९३-९४ आणि १९९४-९५ च्या रणजी सामन्यात चमकदार कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले. दुलीप करंडकच्या क्रिकेट सामन्यात त्याने १७१ धावांची खेळी करून १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. गांगुलीने तिथे एक एकदिवसीय सामना खेळला. पण त्याला पहिल्या कसोटी सामन्याच्या टीममधून वगळण्यात आले.
तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने गैरवर्तन केल्याची तक्रार करत नवज्योतसिंग सिद्धू ने संघ सोडला. त्यानंतर त्याच्या जागी गांगुलीची वर्णी लागली. गांगुलीने पहिल्या व दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या भागात शतक ठोकत सामन्याच्या पहिल्या डावात प्रत्येकी एक शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला. १९९७ मध्ये गांगुलीने एकदिवसीय सामन्यात आपले पहिले शतक ११५ धावा काढत मिळवले. त्यानंतर त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सहारा चषक मध्ये सलग चार वेळेस सामना वीरचा मानकरी ठरला. संपूर्ण कारकीर्दीत गांगुली हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून गणला जातो. भारतीय कसोटी संघाने त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ४९ पैकी २१ सामने जिंकले आहे. तो कर्णधार असताना संघातील सेहवाग, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यासारखे अनेक खेळाडू विकसित झाले.
गांगुलीने त्याच्या कारकीर्दीत, त्याने ११३ कसोटी सामने खेळले आणि त्यात ७२१२ धावा केल्या. त्याने आतापर्यंत कसोटीमध्ये २३९ धावांची उत्कृष्ट खेळी केली आहे. तसेच तो ३११ एकदिवसीय सामने खेळला असून २२ शतकांसह ७२ अर्धशतक केले आहे. ४१.०२ च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात ७२१२ धावा केल्या आहेत. २००८ च्या आय पी एल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. गांगुलीने अखेरचा कसोटी सामना २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. त्यात त्याने ८५ धावा केल्यात. तसेच त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना पाकिस्तान विरुद्ध होता, ज्यामध्ये त्याने ५ धावा केल्या. कर्णधार म्हणून गांगुलीने १४६ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी भारतीय संघाने ७६ सामने जिंकले. सौरव गांगुलीला २००४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.