आज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. म्हणूनच राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताला मोठी गुरू-शिष्य परंपरा आहे. प्रशिक्षक आणि विद्यार्थी यापेक्षा कितीतरी वेगळे असे हे नाते आहे. आपण जाणून घेऊयात अश्या प्रशिक्षकांविषयी ज्यांनी भारताला अनेक प्रभावशाली खेळाडू दिलेत…
रमाकांत आचरेकर
रमाकांत आचरेकर मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आचरेकरांच्य मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर, रमेश पोवार या सारखे असंख्य खेळाडू तयार झाले. ७ फेब्रुवारी २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. २०१० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले होते.
पुल्लेला गोपीचंद
पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत. तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे शिक्षक देखील आहेत. त्यांनी सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, श्रीकांत किदांबी, साई प्रणीत, परुपल्ली कश्यप सारखे दिग्गज खेळाडू तयार केले आहे. त्यांना १९९९ मध्ये अर्जुन पुरस्कार, २००१ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, २००५ मध्ये पद्मश्री, २०१४ मध्ये पद्मभूषण तर २००९ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
सायरस पोंचा
सायरस पोंचा हे भारतीय स्क्वॉश कोच आहे. त्यांचा जन्म १९७६ मध्ये मुंबईत झाला. ते सध्या ICL-TNSRA Squash Academy चे प्रशिक्षक तसेच स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस देखील आहेत. त्यांना २००५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. आहेत. तसेच त्यांना तब्बल सहा वेळा ‘Asian Squash Federation Coach of the Year’ देखील मिळाला आहे. त्यांनी जोष्णा चिनप्पा, दिपिका पल्लीकल कार्तिक, सौरव घोषाल आणि वेलवान सेंथिलकुमार अशा अनेक स्क्वॉश खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे.
सतपाल सिंग
गुरू सतपाल म्हणून ओळखले जाणारे हे कुस्ती प्रशिक्षक आणि भारताचे माजी कुस्तीपटू आहेत. १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आणि १९७४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. ते दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते सुशील कुमार आणि प्रियांशु नेगी यांना प्रशिक्षक म्हणून ओळखले जाते. त्यांना १९७४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९८३ मध्ये पद्मश्री, २०१५ मध्ये पद्मभूषण तर २००९ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
निहार अमीन
निहार अमीन हे प्रसिद्ध भारतीय जलतरण प्रशिक्षक आहेत. त्यांना २०१५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय शिखा टंडन तसेच २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या वीरधवल खाडे व संदीप सेजवाळ यांचे प्रशिक्षक होते. तसेच त्यांनी मेघना नारायणला देखील प्रशिक्षण दिले आहे.
प्रदिप कुमार बॅनर्जी
FIFA Order of Merit ने सन्मानित प्रदिप कुमार बॅनर्जी हे एकमेव आशियाई फुटबॉलपटू आहे. प्रदिप कुमार बॅनर्जी हे भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार आहे. त्यानंतर ते प्रसिद्ध असे प्रशिक्षक देखील राहिले आहे. East Bengal आणि Mohun Bagan या भारतातील प्रसिद्ध फुटबॉल क्लबचे व्यवस्थापन देखील केले आहे. त्यांना १९६१ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि ११९० मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.