Thursday, May 2, 2024
Homeनगरहरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्तारोको

हरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्तारोको

वडाळा महादेव |वार्ताहर| Wadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यावे, अन्यथा मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील हरेगाव येथील कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती.

सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ काल हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यातील आरोपींना दोन दिवसात अटक करुन त्यांच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सुमारे तासभर चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे नेवासा रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. वाहनांच्या मोठ्या रांगा तयार झाल्या होत्या.

यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय प्रमुख भीमराज बागुल, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, सरपंच महेंद्र साळवी, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, श्रीरामपूर विधानसभा प्रमुख नितीन दिनकर, प्रा. सुनिता गायकवाड, हरेगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर, वंचित तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडदे, निखिल पवार, नाना खरात, रमेश भालेराव, सुनिल शिंगारे, आकाश सुर्यवंशी, राजु मगर, संजय बोरगे, विशाल सुरडकर, सुहास राठोड, सोनु राठोड, सलिम शेख, मोहन आव्हाड, बंडु शिंदे, रुपेश हरकल, रमाताई धिवर, संतोष मोकळ, गिरीधर आसने, प्रकाश आहिरे, मेजर कृष्णा सरदार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाच्यावतीने तहसिलदार मिलींदकुमार वाघ, पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके, डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, एपीआय जीवन बोरसे उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. पोलीस अधिकारी, कर्मचारी, अशोकनगर फाटा, निपाणी चौकी, रेल्वे ओव्हर ब्रिज, श्रीरामपूर नॉर्दन ब्रँच अशा विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते. नागरिकांना बाह्यवळण करून प्रवास करता येईल यासाठी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी तसेच पथकाने विशेष प्रयत्न केले.

या घटनेत यापूर्वी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात नानासाहेब गलांडे यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या