अकोले (प्रतिनिधी)
पर्यटनस्थळ असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून सुमारे १६०० फूट दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता. सोमवारी (दि.१०) त्याच्याशी फोनवरून संपर्क न झाल्याने आई-वडील नाशिकला आले. त्यानंतर त्यांनी त्याचा तेथे शोध घेतला.
परंतु, तो मिळून न आल्याने त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मंगळवारी (दि.११) तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांनी चौकशी केली असता मित्रांनी तो मोटारसायकलवरून हरिश्चंद्र गडाकडे गेला असल्याचे सांगितले.
त्यानंतर राजूर पोलिसांसह ऋषिकेशच्या नातेवाईकांनी गडाकडे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे एक मोटारसायकल उभी केल्याची दिसून आली. त्यांनतर त्यांनी गडाचा परिसर व कोकणकडा परिसरात शोध घेतला असता १६०० फूट खोल दरीमध्ये एक मृतदेह आढळून आला.
त्यावर राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने ऋषिकेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. यावेळी पोलीस शिपाई विजय मुंडे व पोलीस कोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले. राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.