मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे (NCP) दिग्गज नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी वाशिम जिल्ह्याचे (Washim district) पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता त्यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडल्याचे समोर आले आहे.
राज्य मंत्रिमंडळात मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आहे. यानंतर त्यांना वाशिमच्या पालकमंत्रिपदाचीही (Guardian Minister) जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, आता पालकमंत्रिपद सोडण्याची इच्छा त्यांनी दर्शवली असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता जर मुश्रीफांची इच्छा अजित पवार यांनी पूर्ण केली तर वाशिमच्या पालकत्वाची जबाबदारी कोणाकडे जाते, हे बघणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अद्यापही धुसफूस बघायला मिळत आहे. त्यातच आता हसन मुश्रीफांनी वाशिमचे पालकमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता मामा भरणे यांना अजून कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री केलेले नाही. त्यामुळे आता कदाचित वाशिम जिल्ह्याची जबाबदारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा
दुसरीकडे,बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून गेले काही महिने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. यानंतर काल मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.