Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगधर्म...सामाजिक जाणीवेचा

धर्म…सामाजिक जाणीवेचा

‘घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरूणोदय झाला’ शाहीर होनाजी बाळांच्या या सुरेल भूपाळीने जागं होणारं शिर्डी हे माझं जन्मगाव. पहाटेच्या विमल शांततेवर टपटपणारे स्वरांचे कोमल दवबिंदू गावाला चैतन्याचं अनोखं कोंदण बहाल करायचे. गाव जागं व्हायचं. आज इतक्या वर्षांनंतरही तो सिलसिला चालू आहे.

गावाने ती ओळख शुद्ध, कोमल स्वरांसारखी अंतःकरणात जपून ठेवलेली आहे. पहाटेच्या काकड आरतीच्या दरवळाने अवघी पंचक्रोशी मंत्रमुग्ध होऊन जात असे. आरतीचा टिपेचा स्वर, त्याला साथ देणारा वाद्यांचा सुरेल मेळ, घणघणणाऱ्या घंटेचा मंजूळ प्रतिध्वनी या सुगम कल्लोळाने पहाट फटफटत असे. गावातून, वाड्या-वस्त्यांवरून उसळलेला जनसागर श्रद्धेचा प्रसाद घेऊन हळूहळू पांगत असे. दुपारची माध्यान्ह आरती, सायंकाळची धूप आरती आणि रात्रीची शेजारती या नित्यक्रमामुळे मंदिर गावाच्या केंद्रस्थानी होतं. सगळ्याच गोष्टींवर धार्मिकतेचा पगडा होता. सण समारंभ, उत्सव तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांनाही मंदिर संस्कृतीने कवेत घेतलेलं होतं. आईचं बोट धरून हे सगळे साक्षात्कार मी अनुभवलेले आहेत. माझी आई देवभोळी, धार्मिक वृत्तीची. तिच्यासोबत म्हंटलेल्या आरत्या मला चालीसहित आजही तोंडपाठ आहेत. तिच्या आस्तिक जीवनप्रणालीचा ठसा माझ्या अंतःकरणात खोलवर उमटलेला आहे.

- Advertisement -

या अशा धार्मिक वातावरणात माझी जडणघडण झालेली. गावात वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक होते. प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी असली तरी मंदिर हा सगळ्यांच्या आस्थेचा विषय होता. जातीधर्माच्या नावाने वेगवेगळ्या असणाऱ्या गल्ल्या आतून मात्र मानवतेच्या धाग्याने घट्ट बांधलेल्या होत्या. विद्वेषाचा निखारा नव्हता त्यामुळे अफवांची राख निष्कारण उधळली जात नव्हती. एकोपा होता. भाईचारा होता. सगळ्याच जातीधर्मात माझे मित्र होते. अभ्यासाच्या, खेळण्याच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी येणंजाणं होत असे. हा आपला, तो परका असा विषयही मनाला शिवत नसे. आईच्या खूप मैत्रीणी होत्या. वेगवेगळ्या जातीधर्माच्या. अडल्या नडल्या गोष्टींसाठी धावून जाण्याचा तिचा स्वभाव होता. लहान मुलांचं दुखणं खुपणं तिला चटकन समजत असे. त्यासाठीची तिची काही औषधं आणि विशिष्ट प्रकारच्या उपचार पद्धती होत्या. कुणाच्या संकटात त्याला धीर देण्याचं तिचं कसब वाखाणण्याजोगं होतं. कुणाला पैशांची नड असेल तर कुवतीनुसार तीही भागवण्याचा तिचा प्रयत्न असे. इतरांच्या मदतीसाठी ती सदा तत्पर असे. मी हे सगळं जवळून न्याहाळत होतो. धार्मिकतेच्या पदराखाली तिने निष्ठापूर्वक सांभाळलेला हा सामाजिक जाणीवेचा वसा मी प्रयत्नपूर्वक मिळवला. अल्पसं का होईना जे हाताला लागलं ते पुढील आयुष्यात जोपासण्याचा प्रयत्न केला.

आईचा सामाजिक जाणीवेचा धर्म हा ईश्वरावरील असणाऱ्या तिच्या अढळ श्रद्धेतून निर्माण झालेला होता. त्यामुळे त्याला समर्पणाची किनार होती, आत्मिक जिव्हाळ्याचा करूणार्द्र आशय होता. विसंवादाची फट भरून काढायला थोडी संवादाची माती मिळावी म्हणून ती आयुष्यभर प्रार्थनाच करीत आलेली आहे. तिच्या प्रार्थनेसोबत जगभरातल्या प्रार्थनांचा निनाद जसजसा उंचावत जाईल तसतशा जातीधर्माच्या भिंती भूईसपाट होतील आणि अंती मानवता हाच धर्म शिल्लक राहील.

आपल्या परंपरा, आपला प्रदेश, आपल्या श्रद्धा आणि आपल्या इतिहासाने आपल्याला जन्मतःच ‘धर्म’ नावाच्या चौकटीत बंदिस्त केलेलं आहे. प्रत्येक धर्माची स्वतंत्र आचारसंहिता आहे. त्यानुसार जगण्या वागण्याचं बंधन आहे. मग रितीरिवाज आणि त्याला जोडून येणारी जीवनपद्धती. परंतु याचा जेव्हा अतिरेक होतो आणि दांभिकपणा वाढत जातो तेव्हा धर्माला वाकवणारी बळकट व्यवस्था निर्माण होते. माणसाचं माणूसपण हिरावून घेतलं जातं. त्याचा पोषाख बदलतो. त्याचं राहणीमान बदलतं. त्याची प्रतिकं बदलतात. धर्माच्या मथळ्याखाली त्याची बटबटीत ओळख निर्माण होते. आतला माणूस असहायपणे मरून जातो…

विविधतेने नटलेल्या या देशात मला धर्माचं सार्वभौमत्व मान्य आहे. परंतु धर्मालाच कुणी पाय म्हणतं आणि त्याशिवाय जीवन अनुसरणं अशक्यप्राय म्हणतं तेव्हा त्यांची खरोखरच कीव येते. शाळेच्या नोंदणी रजिस्टरपुरता धर्म मर्यादित ठेऊन माणूस म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी प्रश्न चुटकीसरशी निकालात निघतील. परंतु धर्माचं राजकारण करणाऱ्या मुखंडांना ते नको असतं. वादाची ठिणगी टाकून आगपेटीतील धर्मरूपी तांबडा फॉस्फरस त्यांना नेहमी धगधगत ठेवायचा असतो. कुंपण घालून मिळकतीच्या हिश्शासारखा धर्म त्यांना वाटून घ्यायचा असतो. मग तिकडे दंगली घडवून घरे पेटवली जातात. माणसांना जीवंत जाळलं जातं. देश बेचिराख होतो. तरीही त्यांना त्याचं काहीही देणंघेणं नसतं. कुणीतरी एक महात्मा ही वाढत गेलेली दरी सांधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो. विसंवादाला तो संवादाचा मुलामा देऊ पाहतो. परंतु निग्रही सत्याला घाबरून त्याच्या जर्जर देहाची अक्षरशः चाळण केली जाते. धर्मावर अधर्माचा उन्मादी विजय होतो.

लहानपणी असलेला धार्मिकतेचा पगडा. त्यातूनच पुढे विकसित झालेला सामाजिक जाणीवेचा धर्म. नंतर मतलबी धर्माने घेतलेलं उग्र, भयावह रूप. ‘धर्म’ कविता लिहिताना हा सगळा दस्तावेज मस्तकात होता. कविता लिहून झाली. शब्दालयच्या दिवाळी अंकात ती यथावकाश प्रसिद्ध झाली. राष्ट्रवादी विचारकुंभात बेमालूमपणे धर्माची मात्रा मिसळून काम करणाऱ्या एका संघटनेच्या कार्यकर्ता मित्राला ही कविता रूचली नाही. त्याने काही बदल सुचवले. मी काहीच बोललो नाही. नाराजीचा विखार टाकून तो निघून गेला. त्याने त्याचा धर्म पाळला. मौन साधून मी माझा धर्म पाळला.

धर्म म्हणजे दीनदुबळ्यांविषयी असणारा कळवळा. गरजवंताला दिलेला मदतीचा हात. उपेक्षितांसाठी उभा केलेला हक्काचा निवारा. आस्थेचा परीघ अमर्याद वाढवत नेणं तसेच आपल्या कृतीने इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणं म्हणजे धर्मपालन. धर्म म्हणजे स्वतःभोवती विणलेला आढ्यतेचा कोष फाडून बाहेर येणं आणि या सुंदर दुनियेत विरघळून जाणं. ज्याला हे कळालं त्याला धर्म समजला. विसंवादाची फट रूंदावत जाऊन त्याची दरी होण्याअगोदर थोडी संवादाची ओली माती टाकून जगातल्या सर्वश्रेष्ठ मानवता धर्माचं सचोटीने पालन करणं हाच या युगाचा खराखुरा ‘धर्म’ आहे.

// धर्म //

मी मानतो

धर्माचं सार्वभौमत्व

परंतु

धर्म म्हणजे पाय नव्हेत

की ज्यावाचून चालणे देखील अशक्य.

धर्म असतो

आगपेटीतील काडीवर

लिंपलेला तांबडा फॉस्फरस

जर घसरलाच वादाच्या मुद्यावर

तर

संघर्षाच्या ठिणग्या उडाल्याशिवाय

राहत नाही.

धर्म नसतो

काटेरी तारेचे कुंपण असलेला

तुमच्या – माझ्या

मिळकतीचा पिढीजात हिस्सा

अथवा

कागदावर लिहिलेल्या

‘धर्म’ या अडीच अक्षरी शब्दाच्या उंचीइतका.

तुम्हाला ठाऊक आहे

धर्मामुळे घरे पेटतात

माणसे आणि देशसुद्धा.

मी धर्माच्या अखंडतेविषयी

आता तुम्हाला सांगणार नाही

फक्त

तुमच्या माझ्यातील

वाढत जाणारी विसंवादाची फट

भरून काढायला

थोडी संवादाची माती मिळेल काय ?

म्हणून हवी तर

मनःपूर्वक प्रार्थना करीन….

।। शशिकांत शिंदे ।।

(९८६०९०९१७९)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या