अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाल्याने मोठी रक्कम आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस व निवडणूक यंत्रणेच्या भरारी पथकाने सोमवारी (12 जानेवारी) सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी छापा टाकला. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद रक्कम अथवा साहित्य आढळून आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे हे प्रभाग क्रमांक 15 मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी सायंकाळी ते घरी जेवणासाठी गेले असताना पोलीस व निवडणूक अधिकार्यांच्या भरारी पथकाने त्यांच्या घरी अचानक छापा टाकून तपासणी सुरू केली. हवाल्यामार्फत मोठी रक्कम आल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष तपासणीत कोणतीही रक्कम किंवा आक्षेपार्ह बाब आढळली नाही. याच दरम्यान शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर निवडणूक अधिकार्यांच्या भरारी पथकाला बोलावून संयुक्तपणे तपासणी करण्यात आली, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, सदर कारवाई ही निवडणूक अधिकार्यांच्या भरारी पथकाने केली असून, त्यात पोलीस कर्मचारी सहभागी होते. तपासणीत कोणतीही रक्कम किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. दरम्यान, अनिल शिंदे यांच्या पत्नी व माजी महापौर शीला शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत, शिवसेनेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.




