Saturday, May 4, 2024
Homeनगरपारनेरच्या तहसीलदारांनी ‘तो’ अंत्यविधी प्रसिध्दीसाठी केल्याचा आरोप

पारनेरच्या तहसीलदारांनी ‘तो’ अंत्यविधी प्रसिध्दीसाठी केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेरच्या तहसीलदार यांनी करोना मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक आले नसल्याने त्यांनी स्वत: अंत्यविधी केला. वास्तवात तहसीलदार यांनीच वडिलांच्या अंत्यविधीसाठी येऊ नका, सांगून स्वत:च अंत्यविधी उरकून प्रसिध्दी मिळवून त्यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याचा आरोप मयताचा मुलगा रमेश खोडदे व अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून पारनेर तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे.

रमेश खोदडे सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांचे कर्जुलेहर्या (ता. पारनेर) येथील कोविड सेंटरमध्ये 19 एप्रिल रोजी निधन झाले. मोठा भाऊ केईएम हॉस्पिटल मुंबई येथे करोनाच्या उपचारासाठी दाखल होता. विजय आहिरे यांनी फोन करून वडिलांच्या निधन झाल्याची माहिती दिली. सायंकाळी पारनेर तहसीलदार यांनी फोन करून अंत्यविधीसाठी येणार की नाही? याबाबत विचारणा केली. त्यांच्या मुलाने त्यांना आम्ही निघालो असल्याचे सांगितले.

- Advertisement -

मात्र, त्यांनी दहा ते पंधरा मिनीटांत अंत्यविधी करून घेत आहोत तुम्ही येऊ नका, असे स्पष्ट केले. त्यांनी अंत्यविधी करू नका, आमचे जवळचे नातेवाईक येत असल्याने थांबण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी फोन कट केला. दुसर्‍या दिवशी सकाळी कर्जुले हर्या येथील कोविड सेंटरला गेलो असता वडिलांचे कपडे देण्यात आले. मात्र, त्यांचे आधारकार्ड व रेशनकार्ड देण्यात आले नाही.

या कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी 20 हजार रुपयांची मागणी केली. अन्यथा केस पेपर व मृत्यू दाखल्यासाठी कागदपत्र देणार नसल्याचे सांगितले. तसेच वडिलांच्या अस्थीसाठी तहसीलदार यांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप खोदडे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या