Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखआरोग्य शिबिरातून आरोग्यभान वाढेल?

आरोग्य शिबिरातून आरोग्यभान वाढेल?

आरोग्याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. उतारवयात माणसांना ग्रासणार्‍या व्याधींनी युवा पिढी अकाली बळी पडत आहे. या परिस्थितीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न वैद्यकीय तज्ञ करत आहेत. पौगंडावस्थेत युवांना मधुमेह जडण्याचे प्रमाण दरवर्षी सुमारे तीन टक्क्यांनी वाढत आहे. एका अंदाजानुसार, 2045 पर्यंत भारतात 13 कोटींहून अधिक लोक मधुमेहग्रस्त असतील. सद्यस्थितीत बारा लाखांहून अधिक मुलांना मधुमेह झाला आहे. सरकारने राज्यातील महिलांची आरोग्य तपासणी केली. नुकतेच महाआरोग्य मेळावे घेतले. त्याचेही माध्यमात प्रसिद्ध झालेले निष्कर्ष चिंताजनक आहेत. महाआरोग्य मेळाव्यात दहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तरुण वयातच गंभीर व्याधींनी गाठणे याचे बदललेली जीवनशैली हे एक कारण आहे. बहुधा त्यामुळेच की काय, ‘आमच्यावेळी असे नव्हते’ हे घराघरातील ज्येष्ठांचे परवलीचे शब्द आहेत. ‘लवकर उठे, लवकर निजे’ ची आणि दोनदा पोटभर जेवणाचे पण अधेमधे काही खायचे नाही ही सवय ज्येष्ठांनी अंगी बाणवली होती. व्यायाम हा त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकातील एक महत्वाचा भाग होता. तथापि अनेक कारणांमुळे आता जीवनशैली बैठी बनली आहे. माणसेही त्याला सरावली आहेत. माणसांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्याचे दीर्घकालीन परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत आहेत. मधुमेह, हृदयविका, कर्करोग, रक्तदाब अशा व्याधींबरोबरच विषाणुंचे नवनवे अवतार त्रासदायक ठरत आहेत. करोनाचे नवनवे विषाणू हे त्याचे चपखल उदाहरण! करोनावर अजूनही संशोधन सुरु आहे. पुढेही सुरु राहिल. करोनाने जगाची व्यवस्था अस्ताव्यस्त केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला चांगलेच धक्के दिले. चोवीस तासात प्राणवायू संयंत्र उभारणी करावी लागली. आरोग्यसेवकांना अथक सेवा पुरवावी लागली. सामान्यांच्या भल्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती सक्षम हवी याची सखोल जाणीव करोनाने करुन दिली. विविध निमित्तांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर सरकार भर देत आहे. गेल्या वर्षी नवरात्रीनिमित्त महिलांची, नुकत्याच पार पडलेल्या महाआरोग्य मेळाव्यात लाखो लोकांची आरोग्य तपासणी पार पडली. माणसांनी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे याची जाणीव या शिबिरांनी करुन दिली. मानवी शरीर आरोग्यातील बदल सूचित करते. तशी चिन्हेही दिसतात. तथापि किती माणसे त्याची दखल घेतात? आरोग्य तपासणी करुन घेतात? आरोग्य तपासण्यांचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य तापसण्या सामान्यांचा आधार ठरु शकतात. अशा तपासण्या वारंवार आयोजित केल्या जाऊ शकतात. अर्थात, तपासण्यांबरोबरच गरजुंना आवश्यक औषधपोचारही उपलब्ध होतील याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. अनारोग्याचा माणसांनी बाऊ करु नये. तथापि आरोग्यातील धोकादायक बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास परिणामांची तीव्रता उणावते. अनारोग्यावर मात करणे काहीसे सोपे होते. बदलत्या काळानुसार नवनव्या व्याधींचा उदय होईल. त्याचा सामना करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण होणे अत्यावश्यक आहे.  वरचेवर आयोजित केल्या जाऊ शकणार्‍या सरकारी आरोग्य तपासणी मोहिमा लोकांमध्ये आरोग्यभान जागवतील का? 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या