हृदयविकाराच्या झटक्यामुळे (heart attack) मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. या घटनांचा आणि त्यामागील कारणांचा अभ्यास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने करावा अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
या घटनांचा दोन पद्धतींनी अभ्यास केला जाणार असून त्यासाठी दोन समूह गठित केल्याचे संस्थेच्या पदाधिकार्यांनी माध्यमांना सांगितले. करोनानंतर अशा घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे तज्ञांचे मत आहे. उपरोक्त संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला. ज्यावर राज्यसभेत चर्चा झाली. या अहवालात 1990 ते 2016 या काळातील घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. 1990 च्या तुलनेत 2016 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण 28 टक्क्यांनी वाढल्याचा निष्कर्ष नमूद आहे.
आयसीएमआरच्या केंद्र सरकारने सुचवलेल्या अभ्यासाचे निष्कर्षही यथावकाश जाहीर होतील. तथापि अशा घटनांच्या वाढीचा वेग जीवघेणा आहे. त्याची दखल शासन घेईलच पण लोकांनीही त्यावर गंभीरपणे विचार करायला हवा. करोना काळात बहुसंख्य लोकांनी घरुन काम केले. अनेक जण अजुनही करत आहेत. बैठी जीवनशैली लोकांच्या अंगवळणी पडली आहे. तंत्रज्ञानातील प्रगती याच जीवनशैलीला प्रोत्साहन देणारी ठरते. तथापि हीच आरामदायी सवय सर्वांगीण आरोग्यासाठी घातक ठरते. शारीरीक व मानसिक आरोग्याच्या गुंतागुंती आणि मृत्यूची जोखीम वाढवते याकडे तज्ञ सातत्याने लक्ष वेधून घेत आहेत. बैठी जीवनशैली हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, संधीवात अशा अनेक दीर्घकालीन व्याधींना आमंत्रण देते. हे परिणाम टाळता येऊ शकतात. त्यासाठी तज्ञ जीवनशैलीत छोटे छोटे बदल सुचवतात.
संतुलित आहार आणि विहार, सकाळी काही मिनिटे चाला, बैठे काम करताना दर 30 मिनिटांनी जागेवरुन उठा आणि थोडेसे चालणे, रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाणे, सुट्टीच्या दिवशी ट्रेकला जाणे, मुलांबरोबर खेळणे, नृत्यासारखे छंद जोपासा, ताणतणावाचे व्यवस्थापन शिका आणि अंमलात आणा हे त्यापैकीच काही कानमंत्र. ठरवले तर जीवनशैलीतील बदल अंगीकारणे सहज शक्य आहे याचे उत्तम उदाहरण डॉ. अभय बंग यांनी घालून दिले आहे. त्याचे विस्तृत वर्णन त्यांनी ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकात केले आहे. तथापि याबाबतीत माणसांची अवस्था ‘कळते पण वळत नाही’ अशी आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण कोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनोवृत्ती अभावानेच आढळते. सामाजिक आणि मानसिक बदलांची प्रक्रिया कमालीची संथ असते. त्यामुळेच ध्येयपूर्तीसाठी त्यात सातत्य ठेवणे आवश्यक असते. आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर जीवनशैलीत तज्ञांच्या सल्ल्याने छोटे छोटे बदल करणे अपरिहार्य आहे हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. वैद्यकीय उपचार दिवसेदिवस अधिकाधिक महागडे होत आहेत. कोणतीही व्याधी जडली की माणसे त्यावर उपचार करण्यासाठी धावाधाव करतात.
उपचारांची मोठी आर्थिक झळही सोसतात. तेव्हा त्यांना जीवनशैलीतील बदलांचे महत्व पटते. पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. शरीराचे आणि मनाचे नुकसान झालेले असते. आरोग्य राखण्यासाठी माणसे एकमेकांना प्रेरणा देऊ शकतात पण तसे प्रयत्न मात्र ज्याचे त्यालाच करावे लागतात. ‘आरोग्यम धनसंपदा’हेच आजच्या काळात सर्वाधिक महत्वाचे आहे याची खुणगाठ माणसांनी मारलेली बरी. त्यासाठी अहवालांची, तज्ञांच्या सल्ल्याची आणि आकडेवारीची वाट का पाहायला लागावी?