हरसूल । वार्ताहर Harsul
आरोग्य ही नैतिक जबाबदारी स्वतःची असली तरी मात्र सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याची आरोग्य विभागाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन खा. राजाभाऊ वाजे यांनी केले.किसान सभातर्फे माकपचे जिल्हा सचिव इरफान शेख यांच्या अध्यक्षतेखाली ठाणापाडा गटातील नागरिकांसाठी ठाणापाडा, ता. त्र्यंबकेश्वर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी खा. वाजे बोलत होते.
प्रथमतः माकपचे जिल्हा सचिव इरफान शेख यांनी प्रास्तविकातुन ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, पाणी, दळणवळण, गाव तेथे स्मशानभूमी तसेच मूलभूत प्राथमिक गरजा मांडत लक्ष वेधले. यावेळी विविध गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहून समस्या सोडविण्यावर भर देणार आहे. खा.वाजे यांनी पुढे सांगितले की, आरोग्य चांगले राखायचे असेल तर प्रथमतः स्वतःने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ही नैतिक जबाबदारी स्वतःचीच आहे. मात्र, आरोग्य विभागाने शासनाच्या विविध योजना, नागरिकांचे आरोग्य व त्यांची काळजी घेऊन जनसेवा केली पाहिजे. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याची आरोग्य विभागाची जबाबदारी असून जो चांगले काम करतो त्यास शाबासकीची थाप तर काम चुकारपणा करणार्यावर कडक कारवाई केली जाईल. सर्व सामान्यांची सेवा हीच आपल्या कामाची पावती असल्याचे खा. वाजे यांनी सांगितले.
यावेळी खा. वाजे यांच्या हस्ते चार हजाराच्या आसपास आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी दोनशेहुन अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी त्याचबरोबर आयुष्यमान कार्डची नोंदणी करण्यात आली.
ठाणापाड्याचे सरपंच वैशाली गावित, त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी गजाजन लेंडी, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, ठाणापाडा गटाचे माजी जि. प. सदस्य रमेश बरफ, हरसूल गटाच्या माजी जि. प. सदस्या रूपांजली माळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, हरसूल बालविकास प्रकल्प अधिकारी मंगला भोये, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, संदीप खैरनार, भास्कर खोसकर, ठाणापाडा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता पवार, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप जाधव, रायते सरपंच भरत लोखंडे, आशा गटप्रवर्तक संगीता भोये, भाऊराव चौधरी, किरण ढोले, काळू वड आदीसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.