Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधआरोग्यऋतू

आरोग्यऋतू

ऋतू बदलादरम्यान आरोग्याची काळजी घेणे सर्वात गरजेचे असते. कारण ऋतूनुसार आपल्या शरीरातही अनेक बदल होतात. हिवाळ्यामध्ये दिवस लहान होत जातात आणि रात्री मोठ्या होऊ लागतात. या बदलाचा परिणाम आपल्या मानसिक, शारीरिक आणि हृदयाच्या गतीवरदेखील होतो. काही संशोधन अहवालांनुसार यामुळे गुणसूत्रांचे बरचसे समूह प्रभावित होतात. यामुळे शरीराचे वजन कमी होणे, वाढणे आणि हार्मोन्सच्या कार्यावर थेट परिणाम होतो. इतकेच नाही तर यामुळे इन्सुलिनचे कार्य आणि चरबी खर्च होण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो. थोडासा बेजबाबदारपणा सर्दी-खोकला, ताप, घसा दुखणे, पोटाचे आजार, स्थूलपणा आणि प्रतिकार क्षमता कमी होणे यांसारख्या त्रासांचे कारण बनू शकते. म्हणूनच निसर्गातील या बदलाचा आनंद घ्यायचा असेल तर ऋतूनुसार आपल्या आहारात बदल करणे आवश्यक ठरते.

डॉ. संजय गायकवाड

‘ड’ जीवनसत्व : हिवाळ्यामध्ये अधिक सूर्यप्रकाश मिळू शकत नाही. काही लोक उन्हाळ्यातील उन्हाचा सामना करू शकत नाहीत. असे लोक या ऋतूमध्ये ‘ड’ जीवनसत्वयुक्त भरपूर खुराक घेऊ शकतात. ‘ड’ जीवनसत्व हे शरीरात रक्ताची पातळी कायम राखण्यासाठी मदत करते. तसेच हाडांच्या आरोग्यासाठीदेखील गरजेचे असते. बर्‍याच प्रमाणात हे जीवनसत्व काही प्रकारच्या कर्करोगाशी लढण्यासाठी वजन कमी होण्यापासून रोखण्यास आणि प्रतिकार क्षमता मजबूत करण्यासाठी मदत करते. उन्हाळ्यात जसजसे तापमान कमी होऊ लागते तशी आपली प्रतिकार क्षमता कमकुवत होऊ लागते. अशा स्थितीत ‘ड’ जीवनसत्वाची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण बनते.

- Advertisement -

डेअरी उत्पादने ः हिवाळ्यामध्ये रोज दूध, दही, पनीर, चीज आदीपैकी कुठल्याही एका पदार्थाचे सेवन करावे. डेअरी उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, जीवनसत्व आणि क्षार असतात. तसेच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. सतत याचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि अतिरिक्त फॅट कमी होतात. यामध्ये साखरेचे प्रमाणही कमी असते. सर्वेक्षणानुसार हिवाळ्यामध्ये संधिवात आणि मधुमेही रुग्णांना अधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत डेअरी उत्पादने त्यांना उपयोगी ठरू शकतात. या व्यक्ती दुधाचे सेवन रात्री जेवणानंतर करू शकतात. कोमट दूध यासाठी फायदेशीर असते. यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि थंडी कमी वाजते. रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन मात्र नुकसानकारक ठरू शकते.

आवळ्याचे सेवन ः बदलत्या ऋतूमध्ये आणि हिवाळ्यात आवळा अमृतासारखा असतो. यामध्ये ‘क’ जीवनसत्व नैसर्गिक रूपात भरपूर प्रमाणात आढळते. या छोट्याशा फळात दोन संत्र्यांइतके ‘क’ जीवनसत्व असते. ‘क’ जीवनसत्व हे उत्तम अँटी ऑक्सिडंट आहे. म्हणूनच हिवाळ्यात त्याची उपयुक्तता वाढते. आवळा खाल्ल्यामुळे संक्रमणाशी संबंधित आजार होत नाहीत. यामध्ये साखर कमी असते आणि फायबर अधिक असतात. त्यामुळे पचनसंस्थाही चांगली राहते. दीर्घकाळापर्यंत नियमितपणे आवळा खाल्ला तर पचनक्रिया मजबूत आणि आरोग्यपूर्ण बनते. तसेच शरीराची रोगप्रतिकार क्षमतादेखील सुधारते. आवळा प्रोटीन मेटॅबॉलिझम वाढवते म्हणूनच व्यायाम करणार्‍या व्यक्तींनी आवळ्याचे सेवन आवश्य करावे.

हळद ः मसाल्यांमधील राणी म्हणजे हळद. हळदीमुळे केवळ सौंदर्यवृद्धी होते असे नाही तर हिवाळ्यात किंवा बदलत्या ऋतूमध्येसुद्धा ती आरोग्याची देखभाल करते. हळदीचे गुणकारी घटक संक्रमणाच्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात. हळदीच्या सेवनामुळे विसरण्याचा आजार होण्याचा धोका कमी होतो. हळदीला चांगले अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल, पोट स्वच्छ ठेवणारी, यकृत आणि हृदयासाठी उत्तम मानले गेेलेले आहे. सांधेदुखीच्या वेदना हळद कमी करते आणि कर्करोगावर नियंत्रण राखण्यासही मदतगार ठरते. हिवाळ्यामध्ये बहुतेक वेळा श्वासासंबंधी तक्रारी सुरू होतात. तेव्हा एक कप दुधात थोडीशी हळद टाकून ते गरम करून दूध प्यावे. हा उपाय अस्थमा, सर्दी, खोकला, कफ आणि थकवा या तक्रारींवर रामबाण ठरतो. हळद आणि मध मिसळून खाल्ल्यास रक्त वाढते.

फळे आणि भाज्या ः हिवाळ्यामध्ये रंगीबेरंगी भाज्या आणि फळे खाल्ल्याने तंदुरूस्त राहता येते. म्हणूनच आहारामध्ये भाज्यांचे प्रमाण वाढवावे. गाजर, मुळा, टोमॅटो यांसारख्या भाज्या खाव्यात. यामध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात. ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात. हिरव्या, पिवळ्या, लाल आणि जांभळ्या रंगाच्या फळांमध्येदेखील भरपूर प्रमाणात प्रतिकार क्षमता वाढवणारे घटक असतात. यामध्ये ‘अ’ जीवनसत्व आणि ‘क’ जीवनसत्वदेखील भरपूर असते. म्हणून रोज एका हिरव्या पालेभाजीचे सेवन आवश्य करावे. या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. ब्रोकोली, पालक, कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये क, ई, के आणि ब जीवनसत्वदेखील असते. ‘के’ जीवनसत्व हे रक्ताच्या गुठळ्या बनण्यापासून रोखते आणि संधिवातासाररख्या आजारापासून बचाव करते. हिरव्या पालेभाज्या आपली प्रतिकार संस्था मजबूत बनवतात.

कार्बोहायड्रेटस् ः हिवाळ्यात दिवस जसजसा छोटा होत जातो तसतसा डिप्रेशनचा धोका वाढतो. पण आपल्या आहारात कार्बोहायड्रेटचा समावेश करून यापासून बचाव करता येऊ शकतो. एका अभ्यासामध्ये आढळून आलेले आहे की, कार्बोहायड्रेटस्युक्त आहार घेतल्याने मूड चांगला राहतो. असे इन्शुलिनमुळेसुद्धा होऊ शकते. कारण कार्बोहायड्रेटस् खाल्ल्यानंतर शरीर इन्शुलिन हार्मोन निर्माण करू लागते. ते रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करते. याव्यतिरिक्त इन्शुलिन मेंदूमध्ये आढळणार्‍या ट्राईपटोफन या घटकालादेखील नियंत्रित करते. यामुळे चांगली भावना अथवा जाणीव घेण्याचे संकेत मिळतात. यासाठी आपण अंड्यातील पांढरा भाग, टोमॅटो, तांदूळ, गहू, सफरचंद, ड्रायफ्रूट आदी घेऊ शकता.

मांसाहारी असणार्‍या व्यक्ती या दिवसात अधिक मांसाहार घेतात. परंतु ही सवय स्थूलपणा वाढवू शकते. आठवड्यातून दोनवेळा चिकन आणि मासे खाता येऊ शकतात. मात्र ज्या भागात चरबी कमी प्रमाणात असते तोच भाग खावा.

स्थूलपणापासून बचाव करा ः ऋतू बदलताना स्थूलपणाचा धोकाही वाढतो. हा धोका सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान राहतो. केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधनानुसार हिवाळ्यात स्थूलपणाचा धोका 20 टक्के जास्त असतो. कारण हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच अनेक जण फास्ट फूड, तेल, मसाले आणि जास्त तळलेले पदार्थ खाऊ लागतात. स्थूलपणापासून बचाव करायचा असल्यास या पदार्थांपासून दूर राहावे. त्याऐवजी बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत. यामुळे शरीर गरम राहते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. उन्हाळ्यात जास्त ऊर्जेची गरज असते. म्हणून असे पदार्थ खावेत जे शरीराला गरम ठेवतात आणि ऊर्जादेखील देतात. सोबत प्रतिकार क्षमतादेखील वाढवतात. या ऋतूत संक्रमणाद्वारे होणारे आजार वाढतात. त्यापासूनही बचाव करावा. प्रोटीनव्यतिरिक्त फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

हेही लक्षात ठेवा ः गाजर, रताळे, टोमॅटो यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे. त्यामुळे अँटी ऑक्सिडंट मिळतात आणि प्रतिकार क्षमता वाढते. हिवाळ्यात तहान कमी लागते तरीही शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी अधिक प्रमाणात पाणी प्यावे. हर्बल चहा प्यावा. एक ग्लास कोमट पाणी सकाळी प्यावे. भरपूर सुकामेवा खावा. त्यात प्रोटीन, फायबर, फायटो न्यूट्रीयंटस् आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ते केवळ आजारापासून रक्षण करत नाहीत, तर आतून शरीर मजबूत बनवतात. यामध्ये ‘ब’ जीवनसत्व असते. तसेच मोड आलेली कडधान्ये, फळे खाल्ल्याने छातीमधील आखडलेपण, श्वास घेण्यास होणारा त्रास या समस्या दूर होतात. लसणामध्ये एलिन नावाचे फ्लेवरिंग एजंट असते. त्यामुळे कफ साचणे दूर होते. म्हणून लसूण खावा.

सर्दी-खोकल्याची समस्या ः हिवाळ्यामध्ये जिवाणू आणि विषाणू सक्रिय होतात. अशावेळी सर्दी- खोकल्यापासून बचाव करण्यासाठी शरीर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यास योग्य बनवणे गरजेचे असते. त्यासाठी शरीराचे तापमान योग्य राखावे. गरम पाण्याने स्नान करावे. कोमट पाणी प्यावे. शरीर गरम कपड्यांनी झाकावे. मनुका, गूळ, गाजर असे लोहयुक्त पदार्थ खावेत.

त्वचा चांगली ठेवण्यासाठी सकाळी कोमट तेलाने मालिश करावी. वात प्रकृतीच्या लोकांनी गायीचे तूप सेवन करावे. याने त्वचेची मालिशही करता येऊ शकते. पोट चांगले राखण्यासाठी दही, वांगी यांचा वापर कमीत कमी करावा. बद्धकोष्ठता होत असेल तर त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे. रात्री नियमितपणे गरम दूध घ्यावे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या