संगमनेर | संदीप वाकचौरे| Sangamner
राज्यामध्ये हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या पाठोपाठ विषबाधा अथवा विष प्राशन घटनांमध्ये वाढ झाल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. हृदयविकाराच्या रुग्णांचा विचार करता सन 2021-22 च्या तुलनेमध्ये 2022-23 मध्ये पाचपट अधिक वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होत जाणार आहे.
राज्य सरकारच्यावतीने नुकताच आर्थिक पाहणी अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्या संदर्भाने आपत्कालीन सेवा पुरवलेल्या रुग्णांच्या संख्येची माहिती राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सन 2021-22 मध्ये हृदयविकार रुग्णांची संख्या ही 4 हजार 594 इतकीच होती, मात्र 2022-23 मध्ये ही संख्या मात्र चक्क 21 हजार 762 इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे प्रमाण अत्यंत धक्कादायक मानले जात आहे. त्या पाठोपाठ विष प्राशन व विषबाधा यांचे प्रमाण 16 हजार 280 इतके होते. ते 2023-24 मध्ये 18 हजार 642 इतके झाले आहे. राज्यात असे प्रमाण लक्षणीय स्वरूपात वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
2021-22 च्या अहवालामध्ये 11 हजार 180 रुग्ण होते. मात्र 2022-23 मध्ये हेच प्रमाण चक्क 72 हजार 421 इतके झाले आहे. ही वाढलेली संख्या धक्का देणारी मानली जात आहे. रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती झालेली संख्या ही 902 इतकी आहेत. ती मात्र अगोदरच्या वर्षापेक्षा सुमारे 237 ने कमी झाली आहेत. गरोदरपणा रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 788, वैद्यकीय रुग्णांची संख्या 7 लाख 7 हजार 218 आहे. हे प्रमाण अगोदरच्या वर्षापेक्षा सुमारे सव्वा लाखाने घटले आहे. वाहनांच्या अपघात प्रमाणात घट झाल्याची आकडेवारून दिसते आहे. 2022-23 मध्ये अवघ्या 22 हजार 332 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. अगोदरच्या वर्षामध्ये हे प्रमाण याच्या दुप्पट दर्शविण्यात आले आहे. विविध प्रकारच्या वाहनांच्या अपघातातील रुग्णांची संख्या 5 हजार 560 असून अगोदरच्या वर्षापेक्षा ही संख्या सुमारे साडेपाचशेने कमी आहे.
भाजण्याच्या घटना राज्यामध्ये 1 हजार 766 दर्शवण्यात आल्या असून मागील वर्षापेक्षा सुमारे 400 रुग्ण वाढलेले दिसत आहेत. पडून अपघात झालेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 160 असून अगोदरच्या वर्षापेक्षा ती निम्म्याने कमी आहे. राज्यामध्ये मोठ्या दुर्घटनाची संख्या 172 असून अगोदरच्या वर्षामध्ये ही संख्या 853 दर्शविण्यात आली आहे, तर इतर रुग्णांच्या संख्येचा विचार करता 1 लाख 23 हजार 604 रुग्ण दर्शवण्यात आले आहेत. मागील वर्षी ही संख्या 14 हजार 523 इतकी होती, तर त्यापूर्वी करोनाच्या काळात 3 लाख 17 हजार 433 दर्शवण्यात आली आहे. राज्यामध्ये एकूण रुग्णांचा विचार करता 11 लाख 11 हजार 327 रुग्णांना आपत्कालीन सेवा पुरवण्यात आली आहे. यासाठी राज्यामध्ये 937 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी 223 रुणवाहिका अत्याधुनिक जीवरक्षक प्रणालीने सुसज्ज आहेत, तर 704 प्राथमिक जीवरक्षक प्रणालीने सुसज्ज आहेत.
हिवतापाने मृत्यू…
राज्यामध्ये कीटकजन्य रोगनिहाय नोंदणी झालेले रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी लक्षात घेता यावर्षी हिवताप असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 340 दर्शवण्यात आली आहे, तर त्यातील 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अगोदरच्या वर्षामध्ये मृत्यू 15 झाले होते. रुग्णसंख्या 19 हजार 770 इतकी होती. हत्ती रोगाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून 422 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. डेंग्यूमुळे राज्यात 27 मृत्यू झाले असून एकूण रुग्णसंख्या 8 हजार 179 दर्शविण्यात आली आहे. मेंदूज्वराचे दोन रुग्ण असून चिकनगुणियाच्या रुग्णांची संख्या 919 इतकी दर्शवण्यात आली आहे. मात्र त्यामुळे कोणताही मृत्यू झालेला नाही.