Sunday, April 27, 2025
Homeनगरउष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत

उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

ढगाळ वातावरण संपल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसा पासून सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेचा कहर असाच सुरू राहिला तर पुढचे दोन महिने अर्थात साठ दिवस शेतकरी बांधवांसाठी अग्नीपरीक्षेचे ठरणार असून उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शेतीकामाचे पूर्ण नियोजन कोलमडले असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान हवामान विभागाने सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी तीन ते चार दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्‍यांची आणखी चिंता वाढली आहे.

यंदा भरपूर पाऊस झाल्याने पाण्याची आबादानी झाली. कधी नव्हे ते यंदा अनेक वर्षांनंतर फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत चांगलीच थंडी राहिली. मात्र, मार्च महिना सुरू होताच उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली. दरवर्षी होळी-पुनवेनंतर उन्हाचा तडाखा सुरू होतो. यंदा मात्र, होळीच्या अगोदर उन्हाचा कडाका सुरू झाला. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तपमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेला आहे. सकाळी सात वाजल्यापासून प्रखर उन्हाला सुरुवात होते. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कडक उन्हाळ्यापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी थंडपेयाचा आसरा घेतला आहे. तिव्र उष्णतेमुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला असून घरात थांबणे देखील मुश्कील झाले आहे. उकाड्यामुळे शरिरातून घामाच्या धारा वाहताहेत. प्रचंड उष्णतेमुळे एसी व पंखे देखील निकामी झाल्यासारखे वाटत आहेेत. महावितरणचा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू असल्याने विजेवर चालणारी उपकरणे देखील कूचकामी ठरल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. यातून सुटका होण्यासाठी अनेकांनी झाडांच्या सावलीचा आश्रय घेतला आहे.

एकीकडे नागरिकांची अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र, शेतीच्या कामावर तिव्र उष्णतेचा विपरित परिणाम झाला आहे. उन्हाच्या तिव्र कडाक्याने शेतातील पिके लवकर पाण्यावर येऊ लागली आहेत. त्यातच महावितरणने आठवड्यातील चार दिवस दिवसा व चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा सुरू ठेवल्याने रात्री दहा, साडेदहानंतर पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी बांधवांना शेतात जावे लागते व रात्रभर पिकाला पाणी द्यावे लागते. पाणी भरण्यामुळे झोप मिळत नाही तर दिवसा प्रचंड उकाड्यामुळे झोप होत नाही. याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.

सध्या अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची कांदा काढणी सुरु झाली आहे. तसेच गहू, हरभरा पिकांचे खळे सुरू आहे. सध्या शेतात काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतु प्रचंड उष्णतेचा त्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. प्रचंड उष्णतेमुळे काम करण्यास मजूर धजावत नसल्याने नाईलाजाने पिकांचे खळे रात्री काढावे लागत आहे. काढणी व सोंगणी झालेल्या कांदा, गहू, हरभरा या पिकांच्या जमिनीला प्रचंड उष्णतेमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगातून रात्री साप, नाग यासारखे प्राणी बाहेर पडत असून त्यामुळे जिविताला धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टीवर बळीराजा जिवावर उदार होऊन मात करण्यासाठी धडपड करत आहे.

सध्या मुळा डाव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे काहीअंशी पाण्याचा प्रश्न जाणवत नसला तरी आवर्तन संपल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या याप्रमाणे विजेचा प्रश्न सतावणारच आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चारापिके करपू लागली आहेत. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुधाळ जनावरांच्या दुधावर देखील परिणाम झाला आहे. जनावरांची दूध देण्याची क्षमता यामुळे कमी झाली आहे. एकंदरित उष्णतेच्या लाटेचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.

पाऊस नाही पडला तरी शेतकरी अडचणीत, पाऊस कमी पडला तरी शेतकरी अडचणीत, अती पाऊस झाला तरी शेतकरी अडचणीत, जास्त थंडी पडली तरी पिके धोक्यात, आभाळ आलं, ढगाळ वातावरण झाले तरी रोगराई पिकांवरच पडणार, प्रचंड उष्णतेच्या झळा देखील शेतकर्‍यांनाच बसतात. उन्हातान्हात रात्रंदिवस मुलाबाळांसह राबराब राबून एका दाण्याचे हजार दाणे करणारा बळीराजा मात्र या सर्वा पासून उपेक्षितच राहिला. त्याकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना खुर्चीच्या राजकारणात अजिबात वेळ नाही. यापेक्षा आणखी काय उपेक्षा बळिराजाची होऊ शकते? असा सवाल शेतकर्‍यांनी विचारला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0
चोपडा | प्रतिनिधी | Chopda जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार...