भंडारदरातील साठा 3100 वर
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरणात काल दिवसभरात केवळ 56 दलघफू पाणी दाखल झाले आहे. दरम्यान काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 306 दलघफू पाणी दाखल झाले होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 3100 दलघफूच्या पुढे सरकला आहे. दरम्यान, काल सोमवारी दिवसभर पाऊस गायब होता. पण रात्री 8 वाजेनंतर आषाढ सरी जोरदार बरसत होत्या. 10 वाजेपर्यंत पावसाचा जोर टिकून होता. त्यामुळे आज मंगळवारी धरणात सोमवारच्या तुलनेत नवीन पाण्याची आवक वाढणार आहे.
सलग दुसर्या दिवशीही आषाढ सरींनी तांडव केल्याने रविवारी धरणात नव्याने विक्रमी 680 दलघफू पाण्याची आवक झाली होती. पण त्यानंतर पावसाने काहीशी हुलकावणी दिल्याने धरणात येणारी आवक मंदावली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल रात्री 3100दलघफू झाला होता. वाकी तलाव भरल्याने, कृष्णवंती नदी वाहती झाल्याने निळवंडे धरणातही आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 71 दलघफू पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 945 दलघफू झाला होता. काल दिवसभरात आवक मंदावली होती.
पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर आणि रतनवाडीत शनिवारी रात्री अक्षरशः धो-धो पाऊस कोसळल्याने डोंगरदर्यांमधून धबधबे आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. ओढेनाल्यांना पूर आला होता.
भातखाचरांमध्ये तुंडूब झाल्याने काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने तब्बल 463 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 2732 दलघफू (24.74 टक्के) साठा झाला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. दरम्यान, रविवारी दुपानंतर पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक मंदावली होती. गत 24 तासांत पडलेला पाऊस असा- घाटघर 45, पांजरे 30 आणि रतनवाडी 47.112 दलघफू क्षमतेचे वाकी तलावाचाही ओव्हरफ्लो कमी झाला असून 376 क्युसकपर्यंत घटविण्यात आला होता. दरम्यान, काल सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. हळू हळू आषाढ सरींनी कमालीचा वेग घेतला 9.30 वाजेपर्यंत भंडारदरात या सरी कोसळत होत्या. घाटघर, रतनवाडी आणि पांजरेतची आषाढ सरींनी नृत्य करण्यास सुरूवात केली होती. हा जोर टिकून राहिल्यास आज धरणांत पुन्हा आवक वाढण्याची शक्यता आहे.
मुळा धरणात 474 दलघफू आवक
कोतूळ |वार्ताहर| Kotul
मुळा धरणाच्या अकोलेतील पाणलोटात आषाढ सरींनी तीन- चार दिवसांपूर्वी जोर धरला होता. पण आता या सरींचा वेग मंदावल्याने मुळा नदीचा विसर्ग कमी झाला असून परिणामी मुळा धरणात पाण्याची आवक रोडावली आहे. रविवारी पाणलोटात पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 474 दलघफू पाणी दाखल झाले होते. पण त्यानंतर मुळा नदीचा प्रवाह कमी झाला होता. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 6731 दलघफू (26 टक्के) झाला होता.
दरम्यान, मुळा पाणलोटातही सायंकाळी 6.30 वाजेनंतर मान्सूनचे पुनरागमन झाल्याने दिलासा मिळाला आहे. रात्री 9.30 वाजेपर्यंत आषाढ सरी जोरदार बरसत होत्या. त्यामुळे आज मुळा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढणार असून धरणात पाण्याची आवकही वाढणार आहे. पाणलोटात शनिवारी धो-धो पाऊस कोसळल्याने ही नदी दुथडी झाली होती. मुळा धरणातही पाण्याची चांगली आवक होत होती. पण रविवारी दुपारनंतर पावसाने काहीसा काढता पाय घेतल्याने आवक मंदावली.
शनिवारी रात्री हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित परिसरात जोरदार पाऊस झाल्याने कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 13375 क्युसेक होता. पण नंतर पावसाचा जोर कमी झाला. काल सकाळी हा विसर्ग 2441 क्युसेकपर्यत खाली आला होता.
दारणात 171 तर गंगापूरमध्ये 44 दलघफू नवीन पाणी
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दारणा तसेच अन्य धरणांच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाच्या पावसाचे अधून मधून आगमन होत आहे. दारणात या पावसामुळे काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत 171 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. भावलीत 75 दलघफू तर गंगापूरमध्ये 44 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दरम्यान, आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पावसाचे स्वरुप मुसळधार नसले तरी मध्यम ते कधी कधी जोरदार स्वरुपाचे आगमन धरणांच्या पाणलोटात होत आहे. जून मध्ये 3.64 टक्क्यांवर असलेले धरण काल 9 टक्क्यांच्या पुढे सरकले होते. काल दारणाच्या भिंतीजवळ 22 मिमी पावसाची नोंद झाली. तर घोटी, इगतपुरी भागातही दमदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे दारणात मागील 24 तासात 171 दलघफू नविन पाण्याची आवक झाली. वरील भावली धरणात 75 दलघफू 24 तासात नविन पाणी दाखल झाले. शुन्य टक्के साठा असलेले भावली काल सकाळी 6 पर्यंत 17.78 टक्क्यांपर्यंत पाणी साठा झाला आहे. वाकी धरणात 15 दलघफू नविन पाणी दाखल झाले. या प्रकल्पात 1.44 टक्के पाणी साठा झाला आहे. भाम प्रकल्पात 56 दलघफू नविन पाणी दाखल झाले. भाम काल सकाळी 9.98 टक्के भरले आहे. सुरुवातीला या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा होता. वालदेवीत 5.21 टक्के पाणी साठा आहे.
गंगापूर धरणात 44 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. या धरणात 5 टक्के पाणी साठा मागील काही दिवसात वाढला आहे. हे धरण 17 टक्क्यांवरुन 22.58 टक्के इतके झाले आहे. कडवात 19 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 10.84 टक्के इतके भरले आहे. काल सकाळी मागील 24 तासांत नोंदलेला पाऊस असा- दारणा 22 मिमी, मुकणे 10 मिमी, वाकी 22 मिमी, भाम 38 मिमी, भावली 72 मिमी, वालदेवी 3 मिमी, गंगापूर 6 मिमी, कश्यपी 2 मिमी, गौतमी गोदावरी 7 मिमी, कडवा 5 मिमी, त्र्यंबक 20 मिमी, अंबोली 16 मिमी, तर गोदावरी कालव्यावरील कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे 19 मिमी पावसाची नोंद झाली.
आज-उद्या पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता
मुंबई आणि कोकणात सोमवारी जोरदार पाऊस कोसळत असल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यास भंडारदरा, मुळा आणि दारणा पाणलोटात काही तासातच मान्सूनचे जोरदार पुनरागमन होते. असा या भागातील शेतकर्यांचा कयास आहे. तसे झाल्यास पाणलोटातसह लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावणार आहे.