Saturday, May 4, 2024
Homeनगर532 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

532 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी 532 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने देण्यात आली असून यातील अतिवृष्टीच्या 210 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले. यामुळे खरीप हंगामातील काढणीसाठी आलेल्या पिकांचा घास शेतकर्‍यांपासून हिरावला गेला. त्यावेळी झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिके शेतात सडली होती. यात सोयाबीन, मका, कपाशी आणि बाजरी पिकांसोबत चारा पिकांचे नुकसान झाले होते. यावेळी महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या पंचानाम्यानूसार शासनाकडे भरपाईच्या रक्कमेची मागणी नोंदवण्यात आली होती.

यात शेतकर्‍यांच्या पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असल्यास त्यांना शेती पिके, फळ पिके, वार्षिक लागवडीच्या पिकांसाठी कोरडवाहू पिकांसाठी प्रती हेक्टर 8 हजार 500 रुपये आणि आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्रातील पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी पेरणी केलेल्या क्षेत्रासाठी प्रती हेक्टर 22 हजार 500 रुपये या प्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना 291 कोटी रुपयांचा निधी शासन निर्णय 11 जानेवारी 2023 नुसार मंजूर करण्यात आला आहे. यातील 210 कोटी रुपयांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आलेले आहे. तर याच कालावधीत सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 241 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा भरपाईचा निधी 20 जून 2023 च्या शासन निर्णयानूसार मंजूर करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या निधीचे लवकरच शेतकर्‍यांचा खात्यावर थेट वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या