मुंबई | Mumbai
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून ठाणे कडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ज्यामुळे ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे सकाळपासून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा बाधित झाली असून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आल्यावर रेल्वे प्रशासन पुढील सुचना देण्यात येईल. या संदर्भात फलाटावर देखील प्रशासनाकडून सुचना देण्यात येत आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी रेल्वे वाहतुक ठप्प झाली असून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली आहे. अप मार्गाने येणाऱ्या गाड्या या ठाण्यापर्यंतच सुरु आहे. ठाणे ते मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सर्व स्थानकांवर जाहीर करण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेच्या गाड्या 15-40 मिनिटे उशिराने धावत असून, काही ठिकाणी वाहतूक थांबली आहे. याशिवाय, माटुंगा, सायन, कुर्ला, आणि वडाळा यांसारख्या भागातही रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदमाता, वाकोला ब्रिज, आणि अंधेरी सबवे येथेही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अनेक प्रवासी स्थानकांवर अडकले
लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक लोक हे ठाणे स्टेशनपर्यंत थांबले आहेत. काही एक्सप्रेस गाड्या सुद्धा रद्द झाल्या आहेत, तर काही उशिराने आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी ठाणे स्टेशनवर बसून आहेत. शिवाय लोकल ठाणे स्टेशनवर थांबले आहेत. तिथे सुद्धा तास दोन तासापासून प्रवासी लोकल सेवा पूर्ववत होण्याची वाट बघत आहेत.
मिठी नदीची पातळी वाढली
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाने कालपासून राज्याला अक्षरशः झोडपून काढलंय. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नवी मुंबई पनवेलला पावसाने धुवून काढलंय. कोकणातही पूरस्थिती आहे. पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातही जोरदार धुलाई केलीय. त्यामुळे जागोजागी पूरस्थिती निर्माण झालीय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




