अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने 8 लाख 27 हजार 118 शेतकर्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून नगर जिल्ह्यात सुमारे 6 लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 3 हजार 258 कोटी 56 लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास 846 कोटी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील 8 लाख 27 हजार 118 शेतकर्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
6 लाख 2 हजार हेक्टरवरील पिकांना फटका
नगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांतील 13 ते 30 तारखेपर्यंत 14 तालुक्यातील 1 हजार 344 गावांमधील 6 लाख 2 हजार 194 हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले होते. यात 8 लाख 27 हजार 118 शेतकर्यांना त्यांचा फटका बसला. यातील जिरायत क्षेत्र 2 लाख 15 हजार 693 हेक्टर, तर बागायती क्षेत्र 3 लाख 74 हजार 541 आणि फळबागाचे क्षेत्र 11 हजार 959 हेक्टर क्षेत्र होते. याबाबतचे पंचनामे गेल्या 15 दिवसात करण्यात आले आणि त्यानूसार महसूल आणि कृषी विभागाच्या एकत्रित सहीने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. त्यानूसार राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. यात अहिल्यानगर तालुक्यात 117 गावात 36 हजार 582 हेक्टरवरील 48 हजार 517 शेतकर्यांचे 50 कोटी 13 लाखांचे नुकसान, पारनेर 99 गावांमधील 52 हजार 708 शेतकर्यांचे 34 हजार 168 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 44 कोटी 51 लाख 97 हजारांचे नुकसान. पाथर्डी 137 गावामधील 1 लाख 7 हजार 643 शेतकर्यांचे 66 हजार 310 हेक्टर क्षेत्रावरील 101 कोटी 29 लाख 80 हजार 30 रुपयांचे नुकसान. कर्जत 119 गावांमधील 65 हजार 578 हेक्टर क्षेत्रावरील 99 हजार 961 शेतकर्यांचे 99 कोटी 43 लाख 25 हजार रुपये नुकसान. जामखेड 87 गावांमधील 55 हजार 481 शेतकर्यांचे 54 हजार 444 हेक्टर क्षेत्रावर 57 कोटी 30 लाख रुपयांचे नुकसान. श्रीगोंदा 115 गावांमधील 67 हजार 674 शेतकर्यांचे 44 हजार 191 हेक्टर क्षेत्रावर 71 कोटी 52 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान. श्रीरामपूर 55 गावांमधील 40 हजार 741 शेतकर्यांचे 31 हजार 395 हेक्टर क्षेत्रावरील 39 कोटी 25 लाख 63 हजार रुपयांचे नुकसान. राहुरी 96 गावांमधील 41 हजार 923 हेक्टर क्षेत्रावर 58 हजार 940 शेतकर्यांचे 64 कोटी 3 लाख 12 हजार रुपये नुकसान. नेवासा 127 गावांमधील 72 हजार 948 हेक्टर क्षेत्रावर 98 हजार 272 शेतकर्यांचे 107 कोटी 44 लाख 79 हजारांचे नुकसान. शेवगाव 113 गावांमधील 78 हजार 469 शेतकर्यांचे 65 हजार 562 हेक्टर क्षेत्रावरील 107 कोटी 25 लाख 91 हजारांचे नुकसान. संगमनेर 108 गावांमधील 25 हजार 971 शेतकर्यांचे 16 हजार 435 हेक्टर क्षेत्र असून 22 कोटी 20 लाख 3 हजार रुपयांचे नुकसान. अकोले 30 गावांमधील 2 हजार 44 शेतकर्यांचे 890 हेक्टर क्षेत्र असून 76 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोपरगाव 80 गावांमधील 45 हजार 207 शेतकर्यांचे 33 हजार 143 हेक्टर क्षेत्र असून 39 कोटी 22 लाख 87 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. राहाता 61 गावांमधील 45 हजार 490 शेतकर्यांचे 38 हजार 621 हेक्टर क्षेत्र असून 42 कोटी 58 लाख 39 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.




