Saturday, May 4, 2024
Homeनगरनगरमधील शेकडो घरांत पुराचे पाणीच पाणी

नगरमधील शेकडो घरांत पुराचे पाणीच पाणी

अहमदनगर (प्रतिनिधी)

शनिवारी दुपारनंतर नगर शहरात बादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. दोन ते अडीच तास कोसळणाऱ्या पावसामुळे नगरच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. लोकांच्या घरात पाणी शिरले होते. शिरलेले पाणी बाहेर काढण्याचे काम रविवारी नागरिकांसह महापालिकेने हाती घेतले होते. शहराच्या विविध भागांतील सुमारे शंभरहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, अनेक ठिकाणी दुकाने, व्यापारी संकुलाच्या बेसमेंटमध्ये पाण्याचे तळे साचले असून या ठिकाणाहून पाणी उपसण्याचे काम रविवारी दिवसभर सुरू होते. प्रशासनाच्या माहितीनुसार नगर शहरातील जुने शहर, नालेगाव आणि आजूबाजूच्या परिसारात सुमारे ८० मिली मीटर पावसाची नोंद झाली असून हा शास्त्रीय भाषेत अतिवृष्टी म्हणून गणला जातो. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास नगर शहरात पावसाला सुरूवात झाली. आधी हलका असणारा हा पाऊस नंतर वाढत गेला. बादळ, वान्यामुळे रस्त्यावरचे काहीच दिसत नव्हते. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहने पाण्यात बुडाली. शहरातील सारसनगर भागातील

त्रिमुर्ती चौक, भगवान बाबा चौक, गुलमोहर रोडवरील मॉर्डन कॉलनी, बाल्हेगाव परिसरातील गणेश चौक, स्टेशन रोडवरील मल्हर चौक, आनंदधाम, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासह अन्य ठिकाणच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते. याची माहिती नागरिकांनी महापालिकेला कळविली. परंतु पाऊस सुरू असल्यामुळे महापालिकेकडून पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाही. दुसऱ्या दिवशी (रविवारी) सकाळी महापालिकेचा अग्निशमन विभाग पाणी काढण्यासाठी कामाला लागला. दरम्यान, नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.. घरातील धान्य भिजले असून भांडी पाण्यात वाहून गेली. वादळी वारासह विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

आधीच भौगोलिकदृष्ट्या अविकसीत असणाऱ्या नगर शहरात शनिवारच्या अतिवृष्टीने धोक्याचा इशाराच दिला आहे. शहरात यापुढे यापेक्षा अधिक मोठा पाऊस झाल्यास काय होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. यासाठी नगरातील राजकारणी, मनपा प्रशासनाने आतापासून काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा कोल्हापूर, सांगली प्रमाणे नगरलाही भविष्यात पावसामुळे पुराचा धोका होऊ शकतो. यासाठी मनपा आपत्ती व्यवस्थापनाने दूरगामी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या