Saturday, May 4, 2024
Homeनगरअतिवृष्टीचे साडेअकरा कोटींचे अनुदान शेवगाव तालुक्याला प्राप्त

अतिवृष्टीचे साडेअकरा कोटींचे अनुदान शेवगाव तालुक्याला प्राप्त

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यासाठी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या दुसर्‍या टप्प्यात 11 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून येत्या 8 ते 10 दिवसांत हे अनुदान संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार सी. एम. वाघ यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात सर्वात जास्त अनुदान शेवगाव तालुक्यास आले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये शेवगाव तालुक्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवल्याने तालुक्यातील 9 गावांना पुराचा तडाखा बसला होता. त्यात शेतकर्‍यांच्या खरीप पिकांचे तसेच जनावरांचा चारा, अनेक जनावरे, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले, घरांची पडझड असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने बाधित शेतकर्‍यांसाठी हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली त्याचे पहिल्या टप्प्यात 16 कोटी 35 लाख 40 हजार रुपये अनुदान आले होते. 33 गावांतील 16 हजार 402 हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी 18 हजार 134 बाधित शेतकर्‍यांना 16 कोटी 35 लाख अनुदान वाटप करण्यात आले.

उर्वरित 46 गावांतील शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा लागली होती. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेवगाव तालुक्यास जिल्ह्यात सर्वात जास्त अनुदान आले आहे मात्र अजूनही अनुदानाची रक्कम पुरेशी नसल्याने तालुक्यातील काही गावांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे हे अनुदान प्राप्त होण्यासाठी आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती अध्यक्ष डॉ क्षितिज घुले यांनी विशेष प्रयत्न केले. पूर परिस्थितीमुळे अनेकांची जनावरे वाहून गेली राहत्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले, अनेक घरांची व विहिरींची पडझड झाली. शेती पिकांसह जनावरांचा चारा तसेच नदीकाठच्या जमिनीतील माती वाहून गेली त्यासाठी अजुनही नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही. शासनाने या नुकसानीचीही भरपाई द्यावी अशी मागणी पूरग्रस्त मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.

साडेचौदा हजार शेतकर्‍यांना वितरण

दुसर्‍या टप्प्यात 11 कोटी 52 लाख 88 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले असून यातून 28 गावांतील 14 हजार 506 बाधित शेतकर्‍यांना 11 हजार 235 हेक्टर क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांसाठी हे अनुदान वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या