अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून सततचा पाऊस सुरू आहे. विशेषतः अतिमुसळधार पावसामुळे दक्षिणेतील सहा तालुके अक्षरशः उजाड होण्याच्या मार्गावर आहेत. यातील अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने नद्या, नाल्यासह ओढ्यांना पूर परिस्थिती असून अनेक ठिकाणी शेती, रस्ते, पूल वाहून गेले आहेत. यामुळे जमिनीमध्ये माती गायब झाली असून रविवारी रात्री ते सोमवारी दिवसभर पावसाची बॅटींग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार सोमवारी तब्बल 35 मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाने कहर केल्याने कर्जतला एनडीआरएफ तर पाथर्डी एसढीआरएफचे (राज्य आपत्ती विभाग) पथक सोमवारी रात्रीच दाखल झाले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. यंदा पावसाळ्यात नगर दक्षिणेतील सर्वच तालुके परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढली आहेत. मात्र, उत्तर जिल्ह्यातील तालुक्यात अजूनही शंभर टक्के पावसाची प्रतीक्षा आहे. उत्तरेतील कोपरगाव, राहाता,अकोले या तालुक्यात आतापर्यंत 80 टक्केच पाऊस झाला आहे. त्या तुलनेत नगर दक्षिणेतील सर्वच तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांच्या पुढे पाऊस झाला असून अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता सर्वजण बेजार झाले असून नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नेवासा या आठ तालुक्यात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे.
सर्वाधिक पाथर्डी तालुक्यात 170.7 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल शेवगाव तालुक्यात 145.4 टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस कोपरगाव तालुक्यात 66.7 टक्के पाऊस झाला आहे. सोमवारी रात्री देखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यात पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर व श्रीगोंदा या आठ तालुक्यांतील 35 मंडलामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सततच्या अतिवृष्टीने शेवगाव, पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर हे चार तालुके अक्षरशः बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या 13 सप्टेंबरपासून पाऊस सुरू असला 19 सप्टेंबरपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दक्षिणेतील तालुक्यांमध्ये पुर स्थिती निर्माण झाली आहे. यात मदत कार्य करण्यासाठी कर्जतमध्ये एनडीआरएफ तर पाथर्डी एसडीआरएफचे पथक सोमवारी रात्री दाखल झाले आहे. या पथकाने शेवगाव तालुक्यातील आखेगाव भगुर येथून 75 जणांना सुरक्षित हलविले आहे. तर कर्जत व जामखेड तालुक्यातील तरडगाव, निंबोडी, मलठाण सीतापूर या गावातून 380 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी तरडगावमधून सातजणांना तर कोरडगावमधून 15 जणांची पूरतून सुटका केली असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
सोमवारी एकाच दिवसात जिल्ह्यात 44.6 मिलीमिटर पाऊस झाल. शनिवार रविवारपाठोपाठ सोमवारीही जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढले. यात नगर 55.3, पारनेर 37, श्रीगोंदा 36, कर्जत 53.5, जामखेड 85.2, शेवगाव 120.6, पाथड 91.7, नेवासा 44.1, राहुरी 18.3, संगमनेर 10.8, कोपरगाव 18.9, श्रीरामपूर 20.9, राहाता 20.4 मिलीमिटर पाऊस झाला. जिल्ह्यात एकाच दिवसात 44.6 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही 109 टक्के झाली आहे.
सोमवारी झालेला पाऊस
पावसाची आकडेवारी सावेडी 84 मिमी, केडगाव 70.5, वाळकी 69.3, नेप्ती 70.8, रुईछत्तीशी 67.8. भाळवणी 69.8, मांडवगण 68.3, कोंभळी 76.5, मिरजगाव 101.3, माही 88, अरणगाव 115.3, खर्डा 76.8, नान्नज 85.8, नायगाव 94.3, पाटोदा 85.8, साकत 94.3. शेवगाव 131.3, भातकुडगाव 83.8, बोधेगाव 148.8, चापडगाव 148.8, ढोरजळगाव 83.8, एरंडगाव 112.8, दहिगावने 112.8, मुंगी 142.8. पाथर्डी 65.3, माणिकदौंडी 65.3, टाकळी 131, कोरडगाव 107.5, करंजी 66.5, मिरी 76.5, तिसगाव 75, खरवंडी 131, अकोले 107.5. नेवासाः सलाबतपूर 150.3, कुकणा 83.8 असा पाऊस झालेला आहे.
सर्वाधिक 150 मि.मी. सलाबतपूरला
जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसात सर्वाधिक पावसाची नोंद नेवासा तालुक्यातील सलाबतपूर मंडळात झाली असून या ठिकाणी 150 मि.मी. पाऊस झालेला आहे. तसेच शेवगावच्या बोधेगाव आणि चापडगावमध्ये प्रत्येकी 149 मि.मी., दहिगावने 143 मि.मी., टाकळीमानूर आणि खरवंडी कासार प्रत्येकी 131 मि.मी., शेवगाव 131 मि.मी., जामखेडचे अरणगाव 115 मि.मी., एरंडगाव 113 आणि ढोरजळगाव 113 मि.मी., कोरडगाव आणि अकोले (पाथर्डी) 107 मि.मी. आणि मिरजगाव (कर्जत) 101 मि.मी. पाऊस झालेला आहे.




