Saturday, September 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनिफाड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

निफाड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

द्राक्षबागांसह शेतात पाणी

- Advertisement -

निफाड / खडकमाळेगाव | प्रतिनिधी

पावसाने अनेक दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर आज निफाडसह तालुक्यातील उत्तरपूर्व पट्टयात खडकमाळेगांव, सारोळे खुर्द, खानगाव नजिक, उगाव, शिवडी, खेडे आदी परिसरात जोरदार हजेरी लावली.त्यामुळे द्राक्षबांगामध्ये आणि शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडलेली होती.उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या पावसाने दुपारी 3 ते 4.30 वाजेदरम्यान सर्वदूर दमदार हजेरी लावली.गत दोन दिवसांपासून काही भागात पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झालेला होता.

दीर्घ काळापासून पावसाने उघडीप दिल्याने रणरणत्या उन्हात वाया जाण्याच्या अवस्थेत असलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असला तरी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने मका, सोयाबीन या पिकांना ऐन दाना भरण्याच्या वेळेस ताण गेल्याने उंबरठा उत्पन्नात घट होईल. या परिसरात कमी-अधिक प्रमाणात पावसाचे दोन दिवसांपासून दुपारी 2 वाजेनंतर आगमन होत असून या पुढेही जोरदार पावसाचे संकेत मिळत आहेत. परिणामी कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती शेतकर्‍यांची राहणार आहे.

सध्या द्राक्षबागांची छाटणी सुरू झाली आहे. गत आठ दिवसांपूर्वी छाटणी झालेल्या द्राक्षबागांना हे मोठे पाऊस बाधक ठरणार असून बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. यापुढे मोठ्या पावसाचे भाकीत वर्तविले जात असल्याने आत्तापर्यंतच्या पावसाळ्यात फक्त धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने नद्यांना पूर आले. धरणे भरली पण विहिरींना अद्याप पावसाचे पाणी उतरले नाही.

उर्वरित पावसाळ्यात मोठे पाऊस झाल्यास विहिरींची जल पातळी वाढण्यास मदत होईल, पण छाटलेल्या द्राक्षबागा अडचणीत येतील. तसेच उर्वरित द्राक्षबाग छाटणीला विलंब होईल. तसेच खरिपातील काढणीस आलेल्या पिकांचे देखील नुकसान होईल, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. दुपारपर्यंत कडक ऊन व दुपारनंतर पाऊस यामुळे टोमॅटो व भाजीपाला पिकांना फवारणीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे उत्तरपूर्व पट्टयातील खडकमाळेगांव, सारोळे खुर्द, खानगाव नजिक, उगाव, शिवडी परिसरातील शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या