सुरगाणा | प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यात मंगळवार संध्याकाळीपासूनच पावसाने जोर धरला असून पावसाची धुव्वाधार बॅटींग सुरु आहे. सततच्या सुरु असलेल्या पावसामुळे मांडवा, खिराटमाळ परिसरात वीजेचा गायब झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विजेच्या सततच्या जाण्यामुळे नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर देखील पडणे मुश्किल झाले आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओहळाला पुर आल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर केवळ पाईप टाकलेल्या मोऱ्यांची फरशी असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी जात असल्याने शेतात, बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत. यामध्ये फणसपाडा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
उंबरठान जवळील निंबारपाडा येथील ओहळाला पूर आल्याने ओहळाला लागून असलेल्या विजेचे खांब पूर्णतः खाली पडून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. मात्र पावसाच्या सरी कमी होताच महावितरण कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.
बाऱ्हे भागातील आंबुपाडा(बे) येथील वाकी नदीला पुर आल्याने गावाशी संपर्क तुटतो. आंबुपाडा, जांभुळपाडा, कोटंबी, मोधळपाडा, खिरमाणी, कळमणे या गावांचा बाऱ्हे भागाशी तसेच तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे आश्रम शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
दरम्यान, सरपंच भाऊ भोंडवे, विलास भडांगे, ग्राम पंचायत सदस्य सुरेश गांगोडे, माधव वाघमारे, चंदर चौधरी, यादव जाधव, जगदीश पवार, युवराज गवळी, नंदराज भोंडवे, नामदेव जाधव, प्रकाश गावित, परशराम गावित, विलास गावित, दतु वाघमारे, आणि ग्रामस्थ आंबुपाडा, जांभुळपाडा,कोटंबी, मोधळपाडा, खिरमाणी, कळमणे यांनी पुलाची मागणी केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




