त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
कालपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पंचलिंग पट्टा डोंगरावरील धबधबे वाहू लागले आहेत. तसेच जलाशय तुडुंब भरून वाहत असून रस्त्यावर पाणी पाणी साचल्याचे दृश्य आहे. धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे…
अहिल्या गोदावरी संगम घाटात पाणी धो धो वाहत आहे. सुदैवाने पावसामुळे अद्याप कुठलीही जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. हा पाऊस शेतीला वरदानच ठरलेला असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जिल्ह्यासह शहरात गेल्या महिनाभर विश्रांती घेतलेला पाऊस गुरुवार पहाटेपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारी पावसाने शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी ही सकाळपासून वरुणराजा बरसत आहे. दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक दिवसांनी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून, दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.