Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात दि.2 जुलैपासून पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असून मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भागात जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दि.4 व 5 जुलैपर्यंत सर्वत्र या प्रकारचा पाऊस सुरू राहील. जुलैमध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्टमध्ये अलनिनो तीव्र होणार असले तरी हिंदी महासागरावर आयओडी देखील जुलैपासून पॉझिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर भागात दि.1 ते 4 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढेल. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार घाट माथ्यावर तीव्र पाऊस होईल. कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर या भागात मुसळधार तसेच अतिमुसळधार पाऊस दि.2 ते 5 जुलैपर्यंत सुरु राहील.

जिल्ह्यात पेरणी योग्य ओल नाही.

मान्सूनने पूर्ण महाराष्ट्र आणि देश व्यापला असला तरी पावसात जोर नाही. अजूनही नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणी योग्य ओल बर्‍याच तालुक्यात म्हणजे पूर्व भागात झालेली नाही. मध्य भागात पुरेशी ओल आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात चांगल्यापैकी ओल आहे. मान्सून किनारपट्टी भागात सक्रिय आहे. मुंबई, पालघरसह नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या कोकणालगत असलेल्या भागात मान्सून सक्रिय आहे. जसे जसे पूर्वेला जावे तसा तसा पाऊस कमी होत जातो. त्यामुळे जिथे पेरणी योग्य ओल आहे तिथेच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

6 जुलैनंतरच पेरणी करावी : खुळे

पुढील 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 6 जुलैपर्यन्त किती पाऊस होतो ते बघून जमिनीत किती ओल येते, ह्याचा अंदाज घेऊन 6 जुलैनंतर जेथे पुरेशी ओल साध्य झाली असेल तरच योग्य वाफ्यावर तीन ते साडेतीन महिने व याची खरीप पिकांची पेरणी करावी. अर्थात तो निर्णय शेतकर्‍यांनी स्वतः विवेकाच्या कसोटीवर व कृषी विभागाच्या सल्ल्यानेच घ्यावा. जुलै 6 नंतर महाराष्ट्रात आठ-दहा दिवस किरकोळ ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. तेव्हा पावसाच्या अशा उघड-झाप खेळीत, जशी उघडीपीची सापड मिळेल तशी, योग्य ओल व योग्य वापस्यावर पेरणी उरकावी. जेथे पर्जन्यमान कमी असेल तेथे मात्र धूळपेरणी टाळावीच, असा सल्ला पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. शुक्रवार (दि.30) पर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे: मालेगाव- 75.2, बागलाण 63.2, कळवण 103.4, नांदगाव 53, सुरगाणा 178.9, नाशिक 56, दिंडोरी 72.8, इगतपुरी 274.2,पेठ 152.8, निफाड 71.7, सिन्नर 58.2, येवला 86.6, चांदवड 48.6, त्र्यंबकेश्वर 219.1, देवळाली 62.5, असा जिल्ह्यात एकूण 93.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सलग पाचव्या दिवशी पावसाची हजेरी

शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (दि.30)सलग पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असून पूर्व भागात मात्र पावसाचा जोर कमी आहे. सततच्या पावसामुळे शहराच्या विविध भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने चालवताना कसरत करावी लागली. शुक्रवारी (दि.30) सकाळपर्यंत पडलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 17.5 मिलिमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत 93.9 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात 247.2 मिमी तर चांदवड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे 48.6 मिमी इतका पाऊस झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या